विद्यापीठ निवडणूक : १ ऑक्टोबरला दुरुस्त मतदारयादी जाहीर होणार | पुढारी

विद्यापीठ निवडणूक : १ ऑक्टोबरला दुरुस्त मतदारयादी जाहीर होणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठ निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तात्पुरत्या मतदार यादीमध्ये वगळलेल्या किंवा चुकीच्या कोणत्याही नोंदीबाबत कुलसचिवांकडे बर्‍याच मतदारांनी आक्षेप नोंदवला. त्यामुळे शासकीय सुट्टी असूनही निवडणूक आणि आवक-जावक विभाग सुरू होता. तक्रार अर्जांची पडताळणी, योग्य दुरुस्त्या करून 1 ऑक्टोबर रोजी दुरुस्त मतदार यादी जाहीर होईल.

विद्यापीठास शासकीय सुट्टी असली तरीही निवडणूक विभागाने मतदारांच्या दुरुस्त्या अर्ज स्वीकारले. विविध पदांसाठी 14 नोव्हेंबर 2022 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. 1 ऑक्टोबरला दुरुस्त मतदार यादी जाहीर होईल. 6 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुरुस्त मतदार यादीसंदर्भात काही आक्षेप असल्यास कुलगुरूंकडे तक्रार करता येणार आहे. 12 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान होईल. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून निकाल जाहीर होईल.

विद्यापीठ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्व विद्यार्थी, प्राध्यापक संघटनांसह विद्यापीठ विकास आघाडी व विद्यापीठ विकास मंचने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सुटा आणि शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी संघटना मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. प्रत्यक्ष मतदान दीड महिन्यानंतर होणार असले तरी निवडणूक प्रचार सुरू झाला आहे.

Back to top button