कोल्हापूर : हद्दवाढीसाठी लवकरच सर्वपक्षीय बैठक | पुढारी

कोल्हापूर : हद्दवाढीसाठी लवकरच सर्वपक्षीय बैठक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची लवकरच संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही आ. जयश्री जाधव यांनी दिली. कोल्हापूर हद्दवाढ सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने आ. जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली, यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ गरजेची आहे. स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांनी खूप प्रयत्न केले आहेत. त्यांच्यापुढे एक पाऊल टाकून मी या लढ्याचे नेतृत्व करण्यास तयार आहे. हद्दवाढीसाठी ग्रामीण जनतेशी समन्वय साधला पाहिजे. लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून सकारात्मक तोडगा काढण्यात येईल. हद्दवाढीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक घ्यावी यासाठी प्रयत्न करू, अधिवेशनात याबाबत आवाज उठविणार आहे. हद्दवाढीच्या प्रश्नांसंदर्भात कृती समितीसोबत कायमपणे राहू, अशी ग्वाही आ. जयश्री जाधव यांनी दिली.

रोजगार निर्मिती व्हावी, मोठे उद्योग, आयटी कंपन्या याव्यात, यासाठी पायाभूत सुविधा निर्माण हव्यात. त्यामुळे शहर विकासाचे पहिले पाऊल हद्दवाढ आहे. हद्दवाढीत समाविष्ट होणार्‍या गावांना प्रत्येकी 25 कोटी रुपये दिले पाहिजेत. तसेच पायाभूत सुविधांसाठी शहरास 500 कोटींचा विशेष निधी दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना हद्दवाढीसंदर्भात पहिले पत्र पाठविण्यात येईल. यासंदर्भात तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी तांत्रिक समिती नेमूया, असे सत्यजित जाधव यांनी सांगितले.

बिल्डर लॉबीसाठी हद्दवाढ कृती समिती सक्रिय असल्याचा आरोप कृती समितीवर होत आहे. याकडे लक्ष वेधून निमंत्रक आर. के. पोवार यांनी 42 गावांचा आराखडा कोणी तयार केला, अशी विचारणा विद्यानंद बेडेकर यांच्याकडे केली. शहर आणि ग्रामीण कृती समितीच्या संयुक्त बैठकीत क्रिडाईने याबाबत स्पषटीकरण करावे, असे पोवार यांनी सांगितले.

हद्दवाढीसंदर्भात कोणत्याही शंकांचे निरसन करण्यास क्रिडाई तयार आहे, असे सांगून क्रिडाईचे विद्यानंद बेडेकर म्हणाले, आतापर्यंत इतर शहरांच्या हद्दवाढीनंतर तेथील प्रतिनागरिकास किती जागा आहे, कोल्हापुरात किती आहे, याची माहिती आणि हद्दवाढीमुळे इतर शहरांचा झालेला विकास याबाबत चित्रफीत तयार करून त्यांचे सादरीकरण करून ग्रामीण जनतेला महत्त्व पटवून देऊ.

बाबा पार्टे म्हणाले, या आंदोलनाचे नेतृत्व शहराचे आमदार म्हणून करावे, कृती समिती आपणासोबत कायमपणे राहील. स्वर्गीय आमदार जाधव यांनी या आंदोलनात सकात्मक भूमिका घेतली होती. त्यांचे उर्वरित काम आपण करावे, अशी विनंती आ. जयश्री जाधव यांना केली. शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून हद्दवाढीचे समर्थन करावे, प्राधिकरण रद्द करावे, असे पत्र सरकारला द्यावे आणि हा प्रश्न सभागृहात मांडून मुख्यमंत्री, राज्यपाल यांना प्रस्ताव द्यावा, अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली. यावेळी राजू जाधव, सुभाष देसाई, अनिल घाटगे, किशोर घाडगे, अशोक भंडारे यांनीही सूचना मांडल्या.

बैठकीस अमरसिंह निंबाळकर, चंद्रकांत पाटील, विवेक कोरडे, हेमा लगारे-पाटील, सुनीता पाटील, सुधा सरनाईक, सुवर्णा मिठारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

शहराचे आमदार म्हणून आंदोलनाचे नेतृत्व करा

हद्दवाढ कशी गरजेची आहे, हे महापालिका प्रशासनास पटवून दिले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात लोकांना जागा उपलब्ध झाली पाहिजे, या तांत्रिक मुद्द्यावर आम्ही हद्दवाढ मागत आहोत. कोणती गावे घ्यावीत, हा सरकारचा प्रश्न आहे. ग्रामीण जनतेशी आम्हीच समन्वय साधायचा असेल तर मग सरकारने काय करायचे, असा सवाल करून अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व आता शहराचे आमदार म्हणून आपणच करावे, अशी सूचना आ. जाधव यांना केली.

Back to top button