कोल्हापूर : घटस्थापनेने उद्यापासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ | पुढारी

कोल्हापूर : घटस्थापनेने उद्यापासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नवदुर्गांची महती सांगणार्‍या चैतन्यदायी नवरात्रौत्सव सोहळ्याची सुरुवात घटस्थापनेने सोमवारपासून होत आहे. घरोघरी घट बसविण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून बाजारपेठेत खरेदीला झुंबड उडाली होती. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातही सर्व तयारी पूर्ण होत आली असून शनिवारी ड्रोन कॅमेर्‍याची चाचणी घेण्यात आली. पोलिस प्रशासनानेही मंदिर परिसरात 80 सीसीटीव्ही कॅमेरे उभारल्याने एकूण 160 कॅमेर्‍यांची नजर नवरात्र काळात अंबाबाई मंदिर आणि परिसरात राहणार आहे.

घटस्थापनेने नवरात्रीला प्रारंभ होत आहे. घटासाठी लागणारे धान्य, माती, खाऊची पाने यासह उपवासाचे पदार्थ, फळे खरेदीला शनिवारी झुंबड उडाली होती. पापाची तिकटी, गंगावेश, महाद्वार रोड, जोतिबा रोडवर महिलांची मोठी गर्दी दिसून आली.

मंडप उभारणीचे काम पूर्ण

दर्शन रांगेसाठी जुना राजवाडा परिसर, सरलष्कर भवन परिसरात मंडप उभारणी करण्यात आली आहे. तसेच बॅरिकेडिंगद्वारे गाभारा दर्शनासाठी जाणार्‍या मुख्य दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले आहे.

नवदुर्गा मंदिरांमध्येही लगबग

अंबाबाई मंदिरातील नवरात्रौत्सव सोहळ्याच्या तयारीसोबतच करवीर नगरीतील त्र्यंबोली, मरगाई, महाकाली, कमलजादेवी, गजलक्ष्मी, तुळजाभवानी, कात्यायनी, रेणुका या मंदिरांमध्येही लगबग सुरू आहे. पंचमीनिमित्त अंबाबाई, तुळजाभवानीच्या पालखीची तसेच त्र्यंबोली मंदिरातील कोहळा पंचमीची तयारीही सुरू आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत अंबाबाई मंदिरातील गारेच्या गणपतीसमोर दररोज सांस्कृतिक कार्यक्रम सुरू राहणार आहे. यामध्ये भजनी मंडळे, भावगीत, भक्तिगीत गायन, भरतनाट्यम, अभंग गीते यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत, अशी माहिती देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली.

Back to top button