कोल्हापूर : नवरात्रौत्सवासाठी येणार 25 लाख भाविक | पुढारी

कोल्हापूर : नवरात्रौत्सवासाठी येणार 25 लाख भाविक

कोल्हापूर, सागर यादव : सन 2019 चा महापूर आणि त्यानंतर दोन वर्षे कोव्हिड अशा सलग तीन वर्षांच्या कालावधीत प्रतीकात्मक व साधेपणाने साजरा झालेला नवरात्रौत्सव यंदा निर्बंधमुक्त साजरा होत आहे. यामुळे यंदाच्या नवरात्रौत्सवाच्या कालावधीत राज्यासह देशभरातून सुमारे 25 लाख भाविक धार्मिक पर्यटनासाठी कोल्हापुरात एकवटणार आहेत. याची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आली आहे.

भारतातील 12 शक्तिपीठापैकी एक असणार्‍या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभर येणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे. सर्वाधिक लोक नवरात्रौत्सवात येत असतात. दरवर्षी 15 ते 17 लाख भाविक नवरात्रीत येतात. मात्र महापूर व कोरोनामुळे गेली तीन वर्षे देशभरातील भाविकांना इच्छा असूनही ते अंबाबाईच्या दर्शनाला येऊ शकले नव्हते. यंदा निर्बंधमुक्त नवरात्रौत्सवामुळे दर्शनाला येणार्‍या भाविकांची संख्या वाढणार आहे. सुमारे 25 लाख भाविक दर्शन घेतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अंबाबाई, जुना राजवाड्यातील तुळजाभवानी, जोतिबा मंदिर, कोल्हापूर शहर परिसरातील नवदुर्गा, जिल्ह्यातील राजर्षी शाहूकालीन नवदुर्गा मंदिरे यांसह विविध देवालयांमध्ये नवरात्रौत्सवात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित असतात.

दसरा सणाची सुवर्ण किनार

कोल्हापूरच्या नवरात्रौत्सवाला ‘दसरा’ सणाची किनारही लाभली आहे. करवीर छत्रपतींचा दसरा अशी याची ओळख आहे. शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याच्या रक्षणकर्त्या रणरागिणी ताराराणी यांच्या काळापासून या दसर्‍याचा वारसा अखंड जपण्यात आला आहे. ताराराणींच्या काळात इसवी सन 1788 पर्यंत राजधानी पन्हाळगडावर दसरा होत होता. यानंतर छत्रपतींची राजधानी कोल्हापुरात तो साजरा होऊ लागला. जुना राजवाड्याच्या तटाबाहेर गंजीमाळ येथे दसरा सण होत होता. पुढे न्यू पॅलेसच्या बांधणीनंतर ‘चौफळा’ माळावर साजरा होऊ लागला. आज हा चौफळ्याचा माळ दसरा चौक म्हणून ओळखला जातो.

सामाजिक एकोप्याचा सण

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत कोल्हापूरच्या पारंपरिक, धार्मिक व सांस्कृतिक दसरा सणाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त करून दिले. जाती-धर्मांतील भेदभाव नष्ट करण्यासाठी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या उद्देशाने सर्व जाती-धर्मीयांचा सहभाग कोल्हापूरच्या नवरात्रौत्सव आणि दसरा सणात होऊ लागला. किंबहुना या सणाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा व प्रबोधनावर भर देण्यात आला.

पर्यटनाच्या विविधतेने नटलेले कोल्हापूर

करवीर काशी – धार्मिक स्थळ, छत्रपतींची राजधानी – ऐतिहासिक भूमी, राजर्षी शाहूंच्या विचारांची पुरोगामीनगरी, कला व क्रीडानगरी या व अशा अनेक बिरुदावल्यांनी कोल्हापूरची जगभर ओळख आहे. सुमारे दोन हजारहून अधिक वर्षांचा प्रदीर्घ वारसा कोल्हापूरला लाभला आहे. अशा विविधतेमुळेच कोल्हापूरची आधुनिक काळात ‘पर्यटन नगरी’ अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. प्राचीन, धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि भौगोलिक विविधतेने कोल्हापूरचे पर्यटन नटले आहे. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळाबरोबरच या कालखंडातील विविध राजवटींच्या इतिहासाचा वारसा येथे पाहायला मिळतो. अनेक गुंफा, मंदिरे, मठ, वास्तू, गडकोट-किल्ले, घाट, तलाव, धरणे, पठारे, जंगले अशी विविधता कोल्हापुरात एकवटली आहे. यामुळे कोल्हापूरला भेट देण्यासाठी जगभरातील पर्यटक उत्सुक असतात.

सर्वधर्मीय स्थळाची विविधता

करवीर काशी असे प्राचीन धार्मिक महत्त्व, करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा, नृसिंहवाडी या देवस्थानांमुळे कोल्हापूरचे धार्मिक पर्यटन प्रसिद्ध आहे. या देवतांच्या दर्शनाला देशभरातून भाविक दरवर्षी कोल्हापुरात येतात. केवळ याच तीन देवतांच्या धार्मिक स्थळांपुरते इथले पर्यटन मर्यादित नसून प्राचीन काळापासून अस्तित्वात असणार्‍या अनेक मंदिरांमुळे इथल्या पर्यटनाचे महत्त्व कित्येक पटींनी वाढले आहे. विविधधर्मीय मंदिर, मस्जिद, चर्चमुळे कोल्हापूरचे धार्मिक पर्यटन सजले आहे.
(क्रमश:)

Back to top button