आमदार प्रकाश आवाडेंच्या भाजप प्रवेशाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची इचलकरंजीला भेट

आमदार प्रकाश आवाडेंच्या भाजप प्रवेशाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची इचलकरंजीला भेट
Published on
Updated on

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा :  मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच इचलकरंजी दौर्‍यावर आलेल्या वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताला माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. यानिमित्ताने चंद्रकांत पाटील आणि हाळवणकर यांच्यात अजूनही दुरावा असल्याचेच दिसले, तर त्यांच्या गैरहजेरीतच मंत्री पाटील यांनी आ. प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशाचा अप्रत्यक्षरीत्या संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात हालचाली गतिमान झाल्या आहेत.

भाजपच्या 2014 च्या सत्ताकाळात हाळवणकर यांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे तत्कालीन मंत्रिमंडळात वजनदार मंत्रिपद असूनही इचलकरंजीकरांच्या निमंत्रणाची चंद्रकांत पाटील यांना तब्बल दीड वर्षे वाट पाहावी लागली होती. आजच्या त्यांच्या भेटीच्या निमित्ताने या आठवणीलाही कार्यकर्ते उजाळा देत होते. त्यामुळे इचलकरंजीच्या 'मंत्रिपदाची' सल आजही कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे जाणवले.

मंत्री पाटील यांनी गुरुवारी भाजप कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी महापालिकेची निवडणूक कधी लागेल हे सांगता येत नाही. मात्र, प्राप्त परिस्थिती पाहून काही राजकीय निर्णय घ्यावे लागतात. कार्यकर्त्यांची मते निश्चित जाणून घेतली जातील. मात्र, वरिष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय आपला समजून कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करीत एकप्रकारे भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या हातात लवकरच 'कमळ' दिले जाणार असे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे आगामी महापालिकेची निवडणूक आवाडेंना सोबत घेऊनच लढवावी लागणार, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांत चर्चा सुरू होती.

हाळवणकरांवर अन्याय आणि सन्मान…

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी हाळवणकर यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला. हाळवणकर यांनी भाजप रुजवण्यासाठी प्रयत्न केले तरीही त्यांचे योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यांनी पक्षाकडे कधीही मागणी केली नाही; मात्र त्यांचा उचित सन्मान झाला पाहिजे, असे मत मांडले. हाच धागा पकडत पक्षात अन्याय सहन करणार्‍यांचा योग्य सन्मान केला जातो, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. तसेच भविष्यात माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा योग्य सन्मान होईल, असा विश्वास देत कार्यकर्त्यांच्या भावना आता गांभीर्याने घेत असल्याचे स्पष्ट केले. तथापि, सात वर्षांत घडलेले नाही ते आता घडणार का? असा प्रश्न ना. पाटील गेल्यानंतर भाजप कार्यालयाच्या वर्तुळात उपस्थित होत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news