कोल्हापुरातील ‘पीएफआय’चा हस्तक मौला मुल्ला जेरबंद | पुढारी

कोल्हापुरातील ‘पीएफआय’चा हस्तक मौला मुल्ला जेरबंद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने बुधवारी मध्यरात्री कोल्हापूरच्या जवाहरनगर-सुभाषनगर परिसरातील सिरत मोहल्ला येथील साहिल अपार्टमेंटमध्ये छापा टाकून मौला नबीसाब मुल्ला (रबी सहाब मुल्ला) (वय 38) याला अटक केली. नाशिक येथील न्यायालयाने त्यास 12 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

‘एनआयए’ व ‘एटीएस’च्या ‘रडार’वर आलेल्या आणि देशभर व्यापलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेचा हस्तक असल्याच्या संशयातून नवी दिल्ली व नाशिकमधील पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पश्चिम महाराष्ट्रात खळबळ
उडाली आहे.

मुल्ला व्यवसायाने ग्राफीक्स डिझायनर असून, त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेसह ‘एटीएस’च्या पथकाने बुधवारी रात्री एकाचवेळी देशभर छापेमारी केली.

साथीदार ‘रडार’वर

संशयित मौला मुल्ला याचा शहरातील विक्रमनगर, टेंबलाईवाडीसह उचगाव येथील मणेर मळा परिसरात सतत वावर असायचा. विक्रमनगर परिसरात तो नेहमी गराड्यात असायचा. संयुक्त पथकांसह राजारामपुरी पोलिसांनीही मुल्लाच्या स्थानिक साथीदारांचा शोध सुरू केला आहे. मुल्लाच्या कारनाम्याची माहिती असल्यास संबंधित माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी केले आहे.

संशयित मुल्ला मूळचा कर्नाटकातील

देशविघातक कृत्यात सहभाग असल्याच्या संशयातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध देशभरात छापेमारी सुरू असतानाच विशेष पथकाने मूळचा कर्नाटकचा; पण सध्या जवाहरनगर-सुभाषनगर परिसरातील सिरत मोहल्ल्यातून संशयिताला ताब्यात घेतल्याची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरली.

संशयितांवर राजारामपुरी पोलिसांचा ‘वॉच’

संशयित मुल्लाने डिसेंबर 2021 मध्ये विक्रमनगरसह परिसरात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी संशयितावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याची कारागृहातही रवानगी करण्यात आली होती. राजारामपुरी पोलिसांचा डिसेंबरपासून त्याच्या हालचालींवर ‘वॉच’ होता.

फ्लॅटवर छापा टाकून संशयिताचा ताबा

बुधवारी मध्यरात्रीला ‘एनआयए’ व ‘एटीएस’च्या संयुक्त पथकातील सूत्रांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. कारवाईसाठी पथक कोल्हापुरात दाखल होत आहे. गरज भासल्यास मनुष्यबळ सतर्क ठेवण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार अधिकार्‍यांसह पोलिसांना रात्रीच पोलिस ठाण्याला तातडीने पाचारण करण्यात आले. पोलिसांचे विशेष पथक सज्ज ठेवण्यात आले. मात्र, पोलिसांच्या मदतीशिवाय संयुक्त पथकाने साहिल अपार्टमेंटमधील दुसर्‍या मजल्यावरील मुल्लाच्या फ्लॅटवर छापा टाकला. संशयिताला ताब्यात घेतले. यावेळी त्याची पत्नी व दोन मुले उपस्थित होती.

 

‘एनआयए’-‘एटीएस’कडून गोपनीयता

पथकातील अधिकार्‍यांनी संशयिताच्या घराची तपासणी केली. खोलीतून काही आक्षेपार्ह कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते. अडीच तासांच्या चौकशीनंतर पथकाने संशयिताचा ताबा घेतला. गुरुवारी पहाटे पाचला विशेष पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सूत्रांकडून समजते. छापा कारवाईबाबत अधिकारी, कर्मचार्‍यांनी गोपनीयता पाळली होती.

छाप्यानंतर परिसरात तोबा गर्दी

संशयित मुल्लाला संयुक्त पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती वार्‍यासारखी पसरली. परिसरातील नागरिकांसह माध्यमांच्या प्रतिनिधींनीही यावेळी तोबा गर्दी केली. खबरदारीसाठी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे, सहायक निरीक्षक भगवान शिंदे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता.

आई, वडील मणेर मळ्यात, संशयिताचे मोहल्ल्यात वास्तव्य

संशयिताचे वडील नबीसाब मुल्ला हे मूळचे कर्नाटकातील. उदरनिर्वाहासाठी मुल्ला कुटुंब 45 वर्षांपूर्वी उचगाव येथील मणेर मळ्यात वास्तव्याला आले. नबीसाब मुल्ला यांना दोन मुले. संशयित मौला ग्राफीक्स डिझायनर असून, त्याने अभियांत्रिकी शिक्षणही घेतले. आई, वडील व त्याचा भाऊ मणेर मळ्यात राहतात. तर संशयित मौला हा पत्नी, मुलांसमवेत सिरत मोहल्ला परिसरात साहिल अपार्टमेंटमध्ये राहत होता.

विक्रमनगरात वादग्रस्त फलक, संशयिताची तुरुंगवारी

6 डिसेंबर 2021 मध्ये त्याने वादग्रस्त डिजिटल फलक विक्रमनगर परिसरात झळकावले होते. या कारणातून दोन गटांत वादावादी झाली होती. तणावही झाला होता. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन फलक हटवल्यानंतर तणाव निवळला होता. याप्रकरणी संशयिताला अटक झाली होती.

पोलिस अधिकार्‍यांवर केला होता हल्ल्याचा प्रयत्न

विक्रमनगर येथील वादग्रस्त पोस्टरप्रकरणी राजारामपुरीचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी संशयित मौला मुल्लाला अटक करून चौकशीसाठी उचगाव येथील मणेर मळ्यात नेले होते. मौलाच्या वडिलांकडून माहिती घेत असताना संशयिताने पोलिस वाहनावर स्वत:चे डोके आपटून घेत आरडाओरड केली. त्यामुळे त्याच्याशी संबंधित असलेल्या दोन-अडीचशेवर तरुणांनी गर्दी करून पोलिस अधिकार्‍यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांविरुद्ध मारहाणीची कोर्टाकडे तक्रार

पोलिसांना संभाव्य घटनेचा अंदाज येताच संशयितांसह पोलिस तेथून बाहेर पडले; अन्यथा अधिकारी, पोलिसांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले असते. पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याची तक्रारही यावेळी मुल्लाने कोर्टाकडे केली होती.

संशयास्पद वर्तन; दबक्या आवाजात चर्चा

मौला मुल्लाच्या संशयास्पद वर्तनाची जवाहरनगर, सुभाषनगरसह सिरत मोहल्ला परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती. सिरत मोहल्ला परिसरातील स्थानिक रहिवासी त्याच्यापासून चार हात दूर राहत होते. विक्रमनगर येथील घटनेनंतर अपार्टमेंटमधील रहिवाशांनीही त्याच्याशी संपर्क तोडला होता. ‘एनआयए’ व ‘एटीएस’च्या कारवाईनंतर परिसरातील रहिवाशांनी कानावर हात ठेवला होता. मुल्लाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या फ्लॅटला कुलूप लावल्याचे दिसून येत होते.

Back to top button