‘देवस्थान’ आराखड्याबाबत मंत्रालयात लवकरच बैठक घेऊ : राजेश क्षीरसागर | पुढारी

‘देवस्थान’ आराखड्याबाबत मंत्रालयात लवकरच बैठक घेऊ : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नवरात्रौत्सव काळात भाविकांना मूलभूत सुविधा द्या, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीत दिल्या. देवस्थान समितीच्या प्रलंबित विकास कामे, प्रस्तावित आराखड्यांसंदर्भात मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करू, असे आश्वासनही दिले.

क्षीरसागर म्हणाले, गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत विविध विकासकामे सुरू आहेत. परंतु, ही कामे मुदतीत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. ऐन नवरात्रौत्सव काळात लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. देवस्थान समितीची प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावावीत आणि प्रस्तावित आराखड्यांच्या प्रती सादर कराव्यात. याबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्?याशी चर्चा करून मंत्रालय स्तरावर बैठक लावू असे सांगितले.

नवरात्रौत्सव काळात मंदिरात होणार्‍या कार्यक्रमात पूर्वापार कार्यक्रम करणार्‍या कलाकारांनाही सामावून घ्यावे. नवरात्रौत्सवात देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी पार्किंग, मंडप व्यवस्था, स्वच्छतागृह, मंदिर परिसरातील दुकानदारांच्या समस्या, सुरक्षा रक्षकांकडून भाविकांशी होणारे वाद, भाविकांच्या मालमत्तेची सुरक्षा, देवस्थान समिती अंतर्गत सुरू असलेली विकासकामे, त्यातील प्रलंबित कामे, प्रस्तावित विकास कामे आदींचा आढावा घेतला.

देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी मंदिर परिसरात 100 सीसीटीव्ही द्वारे लावून भाविकांच्या सुरक्षिततेवर करडी नजर ठेवली जाणार आहे. कोणतेही गैरवर्तन केल्यास सेवेतून निलंबित करण्याचा सूचना दिल्या आहेत. अंबाबाई मंदिरातील दर्शन मंडपासाठी तीन जागांची चाचपणी सुरू असून, संबंधित विभागांशी चर्चा सुरू आहे, असे सांगितले. बैठकीस अप्परधिकारी किशोर पवार, देवस्थान समितीचे उपअभियंता सुयश पाटील, लेखापाल धैर्यशील तिवले, राजेंद्र सावंत, आदी उपस्थित होते.

Back to top button