मोबाईल पासवर्डही ठरतोय सुखी संसारात अडथळा! | पुढारी

मोबाईल पासवर्डही ठरतोय सुखी संसारात अडथळा!

कोल्हापूर, गौरव डोंगरे : माझ्या मोबाईलचा पासवर्ड कशाला पाहिजे? पुण्यात नोकरी होती म्हणून लग्न केलेले… रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन का असतोस / असतेस?… नोकरी मी पण करते, मग घरकाम का करू? यासारख्या कारणांतून कित्येक संसार तुटण्याच्या मार्गावर आहेत. परस्परातील विश्वासाचा अभाव, संशय आणि इगो यामुळे अनेक सुखी संसार मोडत आहेत.

कोरोनानंतर नवदाम्पत्यातील वाद विकोपाला जाऊन अनेकांनी काही महिन्यांतच वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकार पुढे आले. अशा टोकाचे पाऊल उचलणार्‍या दाम्पत्यांना पुन्हा एकत्रित आणण्याची कामगिरी पोलिस मुख्यालयातील महिला समुपदेशन केंद्र बजावत आहे. या समुदेशन केंद्राने अनेक संसार वाचविले आहेत.

पती-पत्नीतील वाद हा नवा नाही. सामानाची यादी-खरेदी, मुलांचे शिक्षण, आई-वडिलांची जबाबदारी, नवीन वस्तूची खरेदी, आर्थिक परिस्थिती अशा कित्येक कारणांमुळे असे वाद घडताना दिसतात; पण अलीकडे हे वाद मिटवायचे कोणी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. एकत्रित कुटुंबापासून अलिप्त राहणार्‍या उच्चशिक्षित दाम्पत्यांच्या भांडणात माघार कोण घेणार, यावरून हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचू लागला आहे.

कोरोना काळात अनेकांनी झटपट लग्नाचे निर्णय घेतले. या काळात झालेल्या लग्नावेळी मुलगा पुणे, मुंबईत नोकरीला होता असे सांगण्यात आले होते; पण तिकडची नोकरी गेल्याने अनेक मुले नव्याने काही व्यवसाय करू लागली. असे अनेक तरुण आपापल्या गावात, शहरात स्थिरावत आहेत; पण लग्नावेळी पुणे, मुंबईत नोकरीची खोटी माहिती का दिली, आमची मुलगी तिकडे राहणार होती, अशा तक्रारी पालक घेऊन येत आहेत.

फोनचा पासवर्ड सांगत नाही

पतीचे वय 54, तर पत्नीचे वय 50 वर्षे. प्रेमविवाह झालेल्या या दाम्पत्यामध्येही वाद झाला. या वादाचे कारण ठरले ते म्हणजे मोबाईल पासवर्ड. लग्नाला 30 वर्षांचा काळ लोटल्यानंतरही एकमेकांवर मोबाईलवरून घेतला जाणारा संशय खर्‍याअर्थाने सर्वांनाच विचार करायला लावणार आहे.

दोन वर्षांत 328 तक्रारी दाखल

2020-21 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत महिला समुपदेशन कक्षाकडे वेगवेगळ्या प्रकारच्?या 328 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये पुरुषांच्याही तक्रारींचा समावेश आहे. अशा अर्जदारांची समजूत घालून यातील 311 अर्ज निकाली काढल्याचे येथील समुपदेशक नंदकुमार निर्मळे व मनाली पवार यांनी सांगितले.

Back to top button