नव्या इथेनॉल वर्षात खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ?

इथेनॉल

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : देशातील पेट्रोलमधील 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट 6 महिन्यांपूर्वीच साध्य केल्यानंतर 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट 2025 अखेरीस साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे.

यासाठी उद्योगांनी अधिकाधिक इथेनॉलनिर्मितीकडे वळावे, यासाठी डिसेंबरपासून सुरू होणार्‍या नव्या इथेनॉल वर्षासाठी इथेनॉलच्या खरेदी दरात प्रतिलिटर सरासरी दोन रुपये दरवाढ करण्यावर एकमत झाल्याचे माहिती सूत्रांनी दिली. याबाबतचा एक प्रस्ताव केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने तयार केला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल.

देशामध्ये इथेनॉलनिर्मिती उद्योगाला 10 टक्के मिश्रणासाठी आवश्यक इथेनॉल निर्माण करण्यासाठी डिसेंबर 2022 ही सुधारित मुदत देण्यात आली होती, तर 20 टक्के मिश्रणासाठी डिसेंबर 2027 हे प्राथमिक उद्दिष्ट होते. तथापि, केंद्राने इथेनॉलला समाधानकारक दर उपलब्ध करून दिल्यानंतर इथेनॉलनिर्मिती गतिमान झाली. उसाच्या उत्पादनामध्येही वाढ झाल्यामुळे साखर उद्योगाने साखर इथेनॉलनिर्मितीकडे वळविली. यामुळे 10 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट जून 2022 ला पूर्ण झाले. आता केंद्राने सुधारित उद्दिष्टानुसार 20 टक्के मिश्रणाचे प्रमाण डिसेंबर 2025 पर्यंत गाठण्याचे निर्धारित केले आहे. यानुसार पेट्रोलियम मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत इथेनॉलला प्रतिलिटर सरासरी दोन रुपयांपर्यंत दरवाढ देता येऊ शकते, असे मत व्यक्त केले आहे.

भारतात साखर उद्योगात इथेनॉलची किंमत ही उसाला देण्यात येणार्‍या किमान वाजवी व लाभकारी मूल्याशी (एफआरपी) निगडित केली आहे. गतवर्षी कृषिमूल्य आयोगाने उसाला प्रतिक्विंटल 290 रुपये (सरासरी 10.25 टक्के उतारा) जाहीर केली होती. यंदाच्या हंगामासाठी प्रतिक्विंटल 305 रुपये इतकी एफआरपी निश्चित केली आहे. यामुळे इथेनॉलनच्या दरात वाढ अपेक्षित आहे.

एका दगडातून दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न

केंद्राला इथेनॉलच्या दरवाढीच्या निर्णयातून एका दगडातून दोन पक्षी मारावयाचे आहेत. या दरवाढीमुळे इथेनॉलचे पेट्रोलमधील 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकते. यामुळे इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्त्व जसे कमी होईल, तसेच इंधनावरील खर्ची पडणारे परकीय चलन वाचविण्यासही मदत होणार आहे. शिवाय प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त होण्याकरिता भारत एक पाऊल पुढे टाकू शकतो. कारण, प्रदूषणाच्या नकाशावर भारतातील अनेक मोठी शहरे सध्या जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये अग्रभागी आहेत.

Exit mobile version