मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही : राजू शेट्टी | पुढारी

मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही : राजू शेट्टी

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधींनी सत्याग्रहाचे शस्त्र हाती घेऊन इंग्रज सरकारला गुडघे टेकायला लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या महाविकास आघाडी सरकारलाही पूरग्रस्तांच्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी गुडघे टेकायला लावण्यासाठीच प्रयाग चिखली ते पंचगंगा उगमापर्यंत नृसिंहवाडी पर्यंतच्या सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला आहे. या सत्याग्रहाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही. मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

कुरुंदवाड येथील मारुती चौकात आक्रोश पूरग्रस्तांचा परिक्रमा पंचगंगेची चिखली ते नृसिहवाडी पदयात्रा आली असता याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत राजू शेट्टी बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, सुरेश सासणे, आण्णासाहेब चौगुले, आण्णासाहेब जोंग आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले, महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाचे अस्त्र दिले आहे. सत्याग्रहाचा अवलंब करून प्रयाग चिखली येथून चालत आलो आहे. डोक्यावर तळपता सूर्य व पायाखाली तापलेली जमीन अशा परिस्थितीत हा आक्रोश मोर्चा घेऊन आलो आहे. पदयात्रेच्या सुरुवातीला सरकारने या यात्रेला बेदखल केले. मात्र, पदयात्रेत हजारो पूरग्रस्त शेतकरी सहभागी झाल्याने सरकारची झोप उडाली आहे, असे त्यांनी सांगितले.

महापुराने सर्वसामान्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत मिळावी व पुन्हा लोकांना महापुराला सामोरे जावे लागू नये म्हणून शासनाने धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र-राज्य सरकारने व कर्नाटक शासनाने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. आपल्या महापुराचे पाणी पुढे सरकत नाही यासाठी विज्ञानाचा आधार घेऊन उपाय योजना राबवणे गरजेचे आहे. वारंवार पुरामुळे नदी काठावरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. घरे वाहून गेली आहेत. त्यांचे विनाअट पुनर्वसन झाले पाहिजे तसेच मागील महापुरातील ५० हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी असल्याचे शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

दरम्‍यान, राजू शेट्टी यांची कुरुंदवाड येथे सभा सुरु असताना एका कार्यकर्त्याने नृसिंहवाडी पुलाजवळ पोलिसांना चकवा देऊन पंढरपूर येथील सरकोली गावच्या जांभळे या शेतकऱ्याने पंचगंगा नदीत उडी मारली. अचानक घडलेल्‍या या घटनेने एकच खळबळ उडाली. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडत असताना रेसक्‍यू फोर्सचे जवान आणि पोलिसांनी त्‍याला पाण्याबाहेर काढून सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अब्दुललाट येथे पदयात्रेत सामील होण्यासाठी निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांची वाहने पोलिसांनी अडवली. पदयात्रेत वाहतूक विस्कळीत होईल म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. आंदोलकांना पदयात्रेच्या काही अंतरावर सोडून वाहने परत फिरतील असा तोडगा निघाल्यानंतर आंदोलकांची वाहने सोडण्यात आली.

माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, जयसिंगपूरचे नगरसेवक शैलेश आडके, मादनाईक आण्णासाहेब चौगुले, बंडू उमडाळे, सुरेश सासने, अभय पाटुकले, उमेश कर्णाळे, मोंनाप्पा चौगुले, सागर शंभूशेट्टी, रामदास मधाळे, सागर मगदूम, विठ्ठल मोरे, विश्वास बालीघाटे आदी पूरग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button