कोल्हापूर : दुभाजकच घेतायत जीव! | पुढारी

कोल्हापूर : दुभाजकच घेतायत जीव!

डिव्हायडर (रस्ता दुभाजक)… वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी… पण हेच डिव्हायडर जीवघेणे ठरत आहेत… कोल्हापूर शहरातील डिव्हायडरना कोणतेही शास्त्रीय नियम नाहीत.. वाट्टेल तसे केल्याने रोज कुठे ना कुठे अपघाताला निमंत्रण मिळत आहे… अख्ख्या शहरातील डिव्हायडर वाहनांच्या धुरांमुळे काळेकुट्ट झाले आहेत… कोणत्याही डिव्हायडरवर कलर नाही की रिफ्लेक्टर नाहीत. डिव्हायडरच्या पलीकडून जाणार्‍या वाहनांच्या लाईटचा उजेड डोळ्यावर पडून अनेकदा अपघात घडत आहेत.

कोल्हापूर ; सतीश सरीकर : शहरात सुमारे 732 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. बहुतांश रस्त्यावर रस्ता दुभाजक आहेत. वास्तविक रस्त्यावर वाहतूक किती, वाहनांचे वर्गीकरण, त्यात एसटी, ट्रक, टँकरसह इतर अवजड वाहतूक, लाईट व्हेईकल वाहतूक, बस थांबे, रिक्षा थांबे आदींचे समीकरण मांडून दुभाजक करावे लागतात. परंतु ते रस्ते वाहतूक नियमानुसार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यातच शहरातील काही रस्ते तब्बल दीडशे ते दोनशे फूट रुंंद तर काही रस्त्यांची रुंदी फक्त 40 ते 50 फूट इतकी आहे. रस्त्याच्या मधोमध दुभाजक आवश्यक आहेत. परंतु राजारामपुरी आईचा पुतळा ते सायबर या रस्त्यावर एका बाजूला तीस फूट तर दुसर्‍या बाजूला साठ फूट जागा सोडून दुभाजक घालण्यात आले आहेत. शहरातील अनेक रस्त्यांची हीच स्थिती आहे.

अपुरे रस्ते, अस्ताव्यस्त पार्किंग

कोल्हापुरात येणार्‍या भाविक, पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय वाढीस लागला आहे. परंतु अनेक ठिकाणी वाहने पार्किंगसाठी जागा नाही. परिणामी हॉटेलच्या बाहेर रस्त्यावरच वाहने लागलेली असतात. एस.टी. स्टँड, स्टेशन रोड, ताराराणी चौक परिसरासह शहरातील मध्यवर्ती भागात ही स्थिती आहे. रस्त्यांची रुंदी अपुरी त्यातच दुभाजक आणि रस्त्याकडेला चारचाकींचे पार्किंग असते. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते.

दुभाजक रंगविण्याची गरज

कोल्हापूर शहरात सर्वाधिक वाहनांच्या वर्दळीचा भाग एस. टी. स्टँड आहे. ताराराणी चौकाकडून दाभोळकर कॉर्नर आणि पुढे रेल्वे स्टेशनपर्यंत दुभाजक केले आहेत. परंतु रात्रीच्यावेळी या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बहुतांशवेळा बंद असतात. त्यातच अनेक नागरिक थेट दुभाजकावर चढून रस्ता ओलांडत असतात. त्यामुळे अनेकवेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ताराराणी चौक ते सर्किट हाऊस, सर्किट हाऊस ते जिल्हाधिकारी कार्यालय – कसबा बावडा या रस्त्यावर अनेकदा अपघात होऊन काही तरुणांचा बळी गेला आहे. काही महिन्यांपूर्वीच मध्यरात्री दोनच्या सुमारास चारचाकी चालकाला दुभाजक दिसला नसल्याने मोठा अपघात झाला. सर्किट हाऊसजवळील फूटपाथला धडकून भिंत फोडून चारचाकी वाहनाने तेथील लोखंडी बस स्टॉप तोडला होता. या अपघातातील तरुणाचा काही दिवसांनी मृत्यू झाला.

मेंटेनन्स महापालिकेकडे, दंडाची रक्कम मात्र पोलिसांना

शहरात सिग्नल उभारणे, त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे आदी कामे महापालिका करत आहे. नो पार्किंगसह शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर पट्टे मारणे, दुभाजक रंगविणे आदींची कामेही महापालिकाच करते. परंतु कोल्हापूर शहरात नो पार्किंगसह इतर ठिकाणच्या वाहनांवर कारवाई करून दंडापोटी मिळालेली रक्कम पोलिस दलाकडे जमा होते. त्यातील एक रुपयाही महापालिकेला वाहतुकीच्या नव्या सुविधा किंवा देखभाल दुरुस्तीसाठी दिला जात नाही. पोलिस दलाकडे जमा होणारी रक्कम सुमारे पाच कोटीवर आहे.

शहरात अनेक ठिकाणी मोडकळीस आलेले रस्ता दुभाजक अपघाताला कारण ठरतात. दुभाजकाची रंगरंगोटी वेळीच होणे आवश्यक आहे. रस्त्यात खड्डे आहेत. त्यातच बहुतांश दुभाजक काळवंडलेले आहेत. रात्रीच्यावेळी वाहनचालकांना दुभाजक दिसत नाहीत. दुभाजकाच्या रंगरंगोटी आाणि दुरुस्तीसाठी यापूर्वी अनेकदा महापालिकेबरोबर पत्रव्यवहार झाला आहे. गणेशोत्सवापूर्वीही महापालिकेला कळविले होते.
– स्नेहा गिरी, पोलिस निरीक्षक,
शहर वाहतूक नियंत्रण शाखा

कोल्हापूर शहरातील महत्त्वाचे चौक आणि प्रमुख रस्ते विविध संस्थांकडे देखभाल-दुरुस्तीसाठी देण्यात आले आहेत. सध्या पावसामुळे दुभाजक खराब झाले असून काळवंडले आहेत. संबंधित संस्थांबरोबर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पावसाळा संपल्यानंतर तत्काळ दुभाजक दुरुस्त करून रंगरंगोटी करण्यात येणार आहे.
– नेत्रदीप सरनोबत,
शहर अभियंता, महापालिका

कोल्हापूर शहराचा विकास आराखडा 2020 मध्ये प्रसिद्ध होणे आवश्यक होते. परंतु अद्याप तो प्रसिद्ध झालेला नाही. त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. सद्य:स्थितीत शहरात ग्रामीण भाग, महामार्गावरून येणारी वाहतूक आणि स्थानिक वाहने फिरत असतात. त्यामुळे रस्ते अपुरे पडतात. नागरिकांवर बंधने येतात. परिणामी विकास आराखडा लवकर करून वाहतुक नियमांची अंमलबजावणी करावी.
— विनायक रेवणकर
वाहतूक सल्लागार

Back to top button