कोल्हापूर : जि.प.त ठोक मानधनावर 300 शिक्षक नेमणार | पुढारी

कोल्हापूर : जि.प.त ठोक मानधनावर 300 शिक्षक नेमणार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे एक हजार जागा रिक्त असल्यामुळे स्वनिधीतून ठोक मानधनावर जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकांची नियुक्ती करावी, असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना बुधवारी देण्यात आले. याला चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

यासंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अर्जुन आबिटकर, अरुणराव जाधव यांनी निवेदन दिले. जिल्ह्यातील डोंगराळ, दुर्गम तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामध्ये काही ठिकाणी एकही शिक्षक नसणार्‍या शाळांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शिक्षक उपलब्ध करून देण्याची गावकर्‍यांकडून वारंवार मागणी होत असते. परंतु, शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषदही शिक्षक उपलब्ध करून देऊ शकत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शिक्षक नसलेल्या शाळांमध्ये राधानगरी, भुदरगड, आजरा, शाहूवाडी, चंदगड, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यांतील शाळांची संख्या अधिक आहे. अन्य तालुक्यांतही शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पाच हजार रुपये ठोक मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात शिक्षकांची सुमारे एक हजार पदे रिक्त आहेत. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या शाळेत शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी टप्प्याटप्प्याने ठोक मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. मानधनावर होणारा खर्च पाहता साधारपणे 300 ते 350 शिक्षकांची नियुक्ती करता येईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Back to top button