
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ए. आर. एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या आणि कोल्हापूरच्या मातीत चित्रीत होणार्या अनुप जत्राटकर लिखित 'कैद' या चित्रपटाचा मुहूर्त दै.'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते पार पडला. या वेळी चित्रपटाचे सीईओ निलेश जाधव, प्रमुख कलाकार देवेंद्र चौगुले, दिग्दर्शक दादू संकपाळ, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ प. महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय शिंदे, कला दिग्दर्शक सतीश बिडकर उपस्थित होते.
वास्तव आणि आभासी जग यात गल्लत करणारा एक तरुण जो हळूहळू आभासी जगात रमू लागतो; पण जेव्हा त्याच्या वास्तवाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा मात्र तो आभासी जगात पलायन करू लागतो. आपल्या सवयींच्या आहारी गेलेला हा तरुण त्याच्याही नकळत मनाच्या चक्रव्युहात असा काही गुरफटतो की त्याला त्यातून बाहेर पडणे मुश्कील होते. मग तो त्याच्या या आभासी जगालाच सत्य समजू लागतो. आभासी चक्रव्युव्हात अडकलेल्या या तरुणाच्याच नजरेतून उलगडत जाणारी कथा 'कैद' या चित्रपटात मांडण्यात आली आहे. यावेळी संजय पटवर्धन, प्रणव राबाडे, तिलक आणि पारस आदी कलाकार उपस्थित होते. चित्रपटात देवेंद्र चौगुले, स्वप्निल राजशेखर, प्रियांका भिडे, अनिल राबाडे, संजय पटवर्धन, हर्षदा राबाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.