
कोल्हापूर : अनिल देशमुख : कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावर नवी रेल्वे धावण्यासाठी सज्ज असून त्याची सर्व तयारी झाली आहे. या गाडीचा प्रारंभ कोणत्याही दिवशी होईल, असे मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचलन व्यवस्थापक मुकुल जैन यांनी बुधवारी सांगितले. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची त्यांनी पाहणी केली. कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असेही त्यानी स्पष्ट केले.
जैन बुधवारी कोल्हापूर दौर्यावर आले होते. सांयकाळी त्यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. रेल्वे स्थानकावर नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्लॅटफॉर्मची तसेच सध्याच्या प्लॅटफार्म विस्तारीकरणाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. यावेळी जैन म्हणाले, मिरज-सोलापूर ही गाडी कलबुर्गीपर्यंत विस्तारित करण्यात येत होती. त्याचे वेळापत्रक निश्चित करताना कोल्हापूर हे महत्त्वाचे शहर असल्याने ही गाडी मिरजेपासून पुढे कोल्हापूरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ही गाडी आता दररोज कोल्हापूर ते कलबुर्गी अशी धावणार आहे.
या गाडीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या गाडीच्या प्रारंभ सोहळा होणार आहे, त्याची तारीख निश्चित होताच, ही गाडी कोल्हापूर ते कलबुर्गी या मार्गावर धावणार आहे. कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेसची मागणी होत आहे. या गाडीबाबत विचार सुरू आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पुणे विभागाचे मुख्य परिचलन व्यवस्थापक स्वप्निल निला, स्टेशन प्रबंधक विजय कुमार, करण हुजगे, रवींद्र कुमार आदी अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर स्थानकाचे संपूर्ण विद्युतीकरण होणार
कोल्हापूर स्थानकावर सध्या रेल्वे ट्रॅकचे (मार्गाचे) विद्युतीकरण झाले आहे. यामुळे इलेक्ट्रिक इंजिन वळवणे आणि ते साईड ट्रॅकवर ठेवता येत नाही. यामुळे सर्वच गाड्याना इलेक्ट्रिक इंजिन जोडता येत नाही. सध्या कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेसला इलेक्ट्रिक इंजिन आहे. तातडीने कोल्हापूर स्थानकाचे संपूर्ण विद्युतीकरण केले जाणार असून त्यानंतर या सर्वच गाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर धावतील, असेही त्यांनी सांगितले.
वर्षभरात महालक्ष्मी एक्स्प्रेस 24 डब्यांची होईल
सध्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. नव्या प्लॅटफॉर्ममुळे 24 डब्यांची गाडी कोल्हापूर स्थानकावर उभी करता येणार आहे; मात्र महत्त्वाच्या स्थानकांवरही 24 डब्यांची गाडी उभी राहील इतक्या लांबीचे प्लॅटफॉर्म असणे आवश्यक आहे. यामुळे मुंबईत सीएसटी स्थानकातही जिथे महालक्ष्मी एक्स्प्रेस थांबते त्या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. हे काम वर्षभरात पूर्ण होईल. यामुळे सध्या 21 डब्यांची असलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस 24 डब्यांची होईल, असेही त्यांनी सांगितले.