

कोल्हापूर : राज्य शासनाच्या सुधारित अनुकंपा धोरणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या 164 वारसांना तसेच सरळ सेवा भरतीमधील ऑर्डरकडे डोळे लावून बसलेल्या 148 अशा एकूण 312 उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या नियुक्ती पत्र वितरण सोहळ्यात नियुक्ती पत्र स्वीकारताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. नियुक्त पत्र हातात पडल्यानंतर स्वप्न साकार झाल्याची भावना उमेदवारांच्या चेहर्यावर दिसत होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत राज्यभरात अनुकंपा धोरण व सरळ सेवेच्या माध्यमातून सुमारे 10 हजार उमेदवारांना विविध विभागांमधील नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील 312 उमेदवारांना नियुक्तीचे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय नियुक्ती पत्र वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमस्थळी करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी मिळालेल्या संधीचा सदुपयोग लोकाभिमुख कामासाठी करावा, असे आवाहन केले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी नवनियुक्तांनी प्रामाणिकपणे काम करून आदर्श निर्माण करावा व कुटुंबाची जबाबदारी जपावी, असे आवाहन केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास आमदार अशोकराव माने, मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह उमेदवार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
अनुकंपाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्व विभागांमधून 97, कोल्हापूर महापालिकेत 30, इचलकरंजी महापालिका 10, कागल नगरपरिषद 3, वडगाव नगरपरिषद 3 व जिल्हा परिषदेतील 24 अशा वारसांना विविध विभागांत नियुक्त्या दिल्या.