कोल्हापूर : मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया…

कोल्हापूर : मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया…
Published on
Updated on

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा :  'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' अशा घोषणांसह पारंपरिक वाद्ये व आतषबाजीने आसमंत दुमदुमला. साऊंड सिस्टीमचा दणदणाट, लाईट इफेक्टचा झगमगाट आणि अबालवृद्ध गणेशभक्‍तांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा जल्‍लोषी वातावरणात बुधवारी गणेश आगमनाच्या मिरवणुका झाल्या. दिवसभर ढगाळ वातावरण, दुपारी चटके बसणारे ऊन अशा वातावरणात गणेश आगमन झाले.

गंगावेस, पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्‍ली व बापट कॅम्पसह शहर व उपनगरांत उभारलेल्या स्टॉल्सवरून गणेशमूर्ती नेण्यासाठी सकाळपासूनच लोकांनी सहकुटुंब गर्दी केली होती. यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गांत बदल करण्याबरोबरच जागोजागी बॅरिकेडस्सह एकेरी मार्ग करण्यात आले होते. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दिवसभर कुंभार गल्ल्यांमध्ये गणेश आगमनाची रेलचेल सुरूच होती. दिवसभर ढगाळ वातावरण, दुपारी चटके बसणारे ऊन अशा वातावरणात गणेश आगमन सोहळा झाला. यानंतर घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींच्या प्रतिष्ठापनेने गणेशोत्सवास प्रारंभ झाला. महापूर आणि कोरोनानंतरच्या तीन वर्षांनी यंदा हा उत्सव साजरा होत असल्याने लोकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

बाप्पाच्या आगमनासाठी सहकुटुंब

बुधवारी सकाळपासूनच लोक सहकुटुंब गणेशमूर्ती नेण्यासाठी कुंभार गल्ल्यांमध्ये दाखल झाले होते. पारंपरिक कुर्ता, डोक्यावर गांधी टोपी, बाप्पा लिहिलेल्या पट्ट्या व स्कार्फ, फेटा, साडी आणि पारंपरिक दागिने अशा वेशभूषेत मुला-मुलींची गर्दी झाली होती. कोणी हातातून, कोणी डोक्यावरून, कोणी दुचाकी तर कोणी चारचाकीवरून गणेशमूर्ती घरी नेल्या. अनेकांनी ढकलगाड्या, आकर्षक रथ, रिक्षातूनही मूर्ती नेल्या. अनेकांनी बाप्पांसोबत आवर्जुन सेल्फी काढले.

मोफत रिक्षा सेवा

गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी अनेक रिक्षा व्यावसायिकांनी प्रतिवर्षीप्रमाणे मोफत रिक्षा सेवा पुरविली. काही रिक्षा मित्र मंडळांनी गेल्या अनेक वर्षांपासून ही उपक्रम जपला आहे. काहींनी अंध-अपंग व गर्भवती महिलांसाठी ही सेवा दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news