महापूर शेतजमिनीसाठी उपयुक्त, रासायनिक खतांचा वापर होणार कमी... | पुढारी

महापूर शेतजमिनीसाठी उपयुक्त, रासायनिक खतांचा वापर होणार कमी...

जयसिंगपूर; संतोष बामणे : कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर शेतपिकांचे नुकसान होऊन कोट्यवधी रुपयांचा फटका शेतकर्‍याला बसला. मात्र, हाच महापूर शेतजमिनीसाठी उपयुक्त ठरला असून, महापुराच्या गाळ मिश्रित मातीने जमिनीतील पोषक घटकांची वाढ झाली आहे. याबाबत शासकीय व खासगी माती परिक्षण प्रयोगशाळेकडून माती परिक्षण करण्यात येत आहे.

माती आणि पिकांसाठी पोषक ठरणार्‍या घटकांमुळे रासायनिक खतांचा वापर कमी होण्यास मदत होणार असून उत्पादन खर्चातही बचत होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ, हातकणंगले, करवीर, गडहिंग्लज, आजरा, चंडगड, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, कागल आदी तालुक्यांना जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुराचा फटका बसला. यात सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसला असून, ४३ गावे महापुराने बाधित झाली होती.

या महापुरात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. महापूर म्हणजे जिल्ह्याला लागलेले ग्रहण आहे, अशी भावना सर्वांची आहे.

मात्र, निसर्गाची किमया अगळीच असते. त्यामुळे महापूर हे संकट असले तरी महापूर शेतजमिनीसाठी उपयुक्त देणारी बाब आहे.

याबाबत ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरात बुडालेल्या शेतीची दत्त कारखान्याने २०० ठिकाणची माती संकलित केली केले. व त्याचे परिक्षण केले होते. यात जमिनीचा पोत सुधारल्याचे समोर आले होते.

त्याचबरोबर २०२१ जुलै महिन्यात महापुरात वाहून आलेल्या मातीची शासकीय व खासगी माती परिक्षण प्रयोग शाळेकडून माती तपासणी करण्यात आली आहे.

यात जमिनीचा पोत सुधारल्याचे समोर आले आहे.

पूरबाधीत शेतीत वाढलेले घटक

पूरबाधित जमिनीचा पीएच हा उदासिन (न्युट्रल) झाला आहे. तसेच इलेक्ट्रीक कंडक्टीव्हीटी (क्षारता) कमी झाले. तसेच सेंद्रिय पदार्थ वाढल्यामुळे सेंद्रीय कर्ब, ह्युमस, फॉस्फरस, पोटॅशियम, फेरस, झिंक इ. घटकांचे पाण्यातील गाळामुळे उपलब्धता वाढली आहे.

त्याचबरोबर क्षारपड जमीनीतील शेतकर्‍यांनी केलेल्या सच्छिद्र पाईपमुळे पाईपच्या वापरामुळे जमीनीतील क्षाराचे प्रमाण निघून जाण्यास फायदा झाला आहे.

कमी झालेले हानीकारक घटक

सततच्या रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीत जमा झालेले हानीकारक घटक जसे लिड, क्रेामेट, क्लोराईडस्, कॅडमीयम, कोबाल्ट, अर्सेनिक यांचा जमिनीतून निचरा होवून त्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

पुरातून आलेल्या वाहून आलेली गाळयुक्त मातीचा थर जमिनीवर जमा झाल्यामुळे जमीनीचा पोत सुधारला आहे. महापुरातील बुडीत शेतीतील मातीची तपासणी केली आहे.

यात विविध घटक वाढून पोत सुधारला असल्याचे समोर आले आहे.

त्याचबरोबर शेतकर्‍यांनी सध्या बुरशीजन्य रोग येऊ नये यासाठी ट्रायकोडर्मा, सुडोमोनस यासारख्या जिवाणूंचा वापर करावा.

जमिनीतील अन्नद्रव्यांचा पिकाला उपयोग होण्यासाठी अझोटोबॅक्टर, स्पुरद, पालाशू, झिंक हे विरघळणारे जीवाणू, रायझोबियम इ. जीवाणूंचा वापर करावा. शेतकर्‍यांनी आपल्या शेतीचे माती परिक्षण करून उत्पादन घ्यावे.

-श्रीदर्शन पाटील, अधीक्षक डेबॉन्स अ‍ॅग्रो माती प्रयोगशाळा

Back to top button