कोल्हापूर: पंढरपूर कनेक्शन; कोल्हापूरातील अर्जुनवाडमध्येही आयकरची छापेमारी | पुढारी

कोल्हापूर: पंढरपूर कनेक्शन; कोल्हापूरातील अर्जुनवाडमध्येही आयकरची छापेमारी

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीत कोल्हापुरातील या कारखान्याच्या भागीदाराच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आहे. अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे हा छापा टाकण्यात आला. ज्यांच्यावर छापा टाकण्यात आला, ते शिरोळ तालुका पंचायत समितीच्या माजी सभापतींचे पती आहेत.

आयकर विभागाचे पथक गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजताच छाप्यासाठी दाखल झाले.त्यांनी दुपारपर्यंत घरातील सर्व कागदपत्रांची झाडाझडती केली. त्यानंतर जयसिंगपूर-संभाजीपूर येथील त्यांच्या आलिशान बंंगल्यांची पाहणी केली. नंतर या पथकाने सांगलीतील त्यांच्या प्लॉटचीही पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या पथकाकडून कागदपत्रे व चौकशीचे काम सुरू होते. या चौकशीत काय निष्पन्न झाले. याची माहिती मिळू शकली नाही.

संबंधित व्यक्तीचा पूर्वीपासून गौण खनिजाचा व्यवसाय आहे. शिवाय वाळू उपसा बोटी तयार करण्याचा कारखाना आहे. त्याचबरोबर नांदेड, नाशिक, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यात भागीदारी आहे. या कारखान्याच्या प्रमुखांच्या काही व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. या प्रमुखाचा भागीदारी असलेल्याच्या निवासस्थानांवरही छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली.

पथकाने घरातील सर्व कपाटे, विविध साहित्य, चारचाकी वाहने, जनावरांचा गोठा यांसह विविध ठिकाणी असलेल्या कागदपत्रांची झाडाझडती घेतली. दोन अधिकारी या सर्व कागदपत्रांची पडताळणी करीत होते; तर अन्य अधिकारी चौकशी करीत होते. तेथे पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. दुपारी त्यांनी आलिशान बंगल्याची तपासणी केली. सांगली येथील प्लॉटचीही पाहणी करून हे पथक दुपारी पुन्हा अर्जुनवाड येथे आले. तेथे पुन्हा कागदपत्रांची जुळवाजुळव करून चौकशीचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत अधिकारी या पती-पत्नीकडून माहिती घेत होते.

दरम्यान, या छाप्यात अर्जुनवाडच्या भागीदारांचे धागेदोरे काय आहेत, याची माहिती मिळू अधिकार्‍यांकडून शकली नाही. मात्र या छाप्यामुळे अर्जुनवाड, चिंचवाड, उदगाव, शिरोळ, जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत या पती-पत्नींशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

राज्यातील 64 जण रडारवर

पंढरपूरमधील एका साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच झाली. शिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या चौकशीवरून 64 जण रडारवर आहेत. त्याचबरोबर नांदेड, नाशिक, बीड जिल्ह्यांतील खासगी कारखान्यांत या सर्वांची भागीदारी आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे ही चौकशी सुरू आहे, यामध्ये काही बेकायदेशीर कारभार आहे का, याचीही उलटसुलट चर्चा असून पंढरपूर कनेक्शनमधूच हा छापा पडल्याची चर्चा होती.

Back to top button