कोल्हापूर-सांगली रस्त्याचे हस्तांतर झाले; दुरुस्तीचे काय? - पुढारी

कोल्हापूर-सांगली रस्त्याचे हस्तांतर झाले; दुरुस्तीचे काय?

कोल्हापूर : सुनील सकटे

कोल्हापूर-सांगली रस्त्याची दुरवस्था रोखण्यासाठी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, हस्तांतर झाले असले, तरी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अद्याप काहीच हालचाल नसल्याने हस्तांतर झाले दुरुस्तीचे काय? असा सवाल वाहनधारकांतून केला जात आहे.

वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करायला भाग पाडणार्‍या कोल्हापूर-सांगली रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. ठेकेदाराने केवळ 65 ते 70 टक्केच काम करून टोल लावण्याची भूमिका घेतल्याने वाद सुरू झाला. हा वाद लवादाकडे गेल्याने प्रक्रिया रखडली. ठेकेदार आणि राज्य शासनाच्या वादामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यास अडचण होती. राज्य शासनाने या रस्त्यावर 20 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. या निधीतून कोणती कामे झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, एवढ्या तुटपुंज्या निधीत रस्त्याची कामे करणार कशी, हा प्रश्न यानिमित्ताने व्यक्त झाला. मात्र, नुकतेच या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झाले आहे. राज्य शासनाने संबंधित ठेकेदाराची रक्कम देण्याची जबाबदारी घेतल्याने प्राधिकरणाने हा रस्ता आपल्याकडे वर्ग करून घेतला आहे.

या मार्गावरील अनेक ठिकाणी सेवामार्ग गायब आहेत. हातकणंगले, अतिग्रे, निमशिरगाव, तमदलगे आदी ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अपघात प्रवण क्षेत्र बनल्याने या ठिकाणी अपघात होतात. हातकणंगले आयटीआय, मजले, लक्ष्मीवाडीत रस्ता खचल्याने अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्ता दुभाजकाची दुरवस्था असून, रस्ता दुभाजकच अपघातास निमंत्रण देत आहेत. वाढते अपघात पाहून राज्य सरकारने 20 कोटींचा निधी मंजूर केला. 20 कोटी रुपयांत रस्ता दुरुस्ती शक्य नसल्याने अक्षरश: ठिगळ जोडल्याप्रमाणे काम झाले.

एनएचआयतर्फे सध्या मिरज सोलापूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. रस्ता हस्तांतरीत झाला असला तरी अद्याप या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात काहीच हालचाल दिसून येत नाही. मिरज सोलापूर या कामासोबत कोल्हापूर सांगली रस्त्यासाठी पुरवणी निविदा काढुन निधी उपलब्ध करु न द्यावा अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरीकांतून होत आहे.

कोल्हापूर-सांगली

Back to top button