इचलकरंजी : कापड महागणार! | पुढारी

इचलकरंजी : कापड महागणार!

इचलकरंजी ; संदीप बिडकर : जुलैअखेर झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे राज्यासह देशातील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, भविष्यात कापूसटंचाईचा धोका अटळ असून, कापड महागण्याचे संकेत वस्त्रोद्योगातील जाणकारांतून वर्तविले जात आहेत.

मराठवाड्यामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. परंतु, अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिके वाया गेली. त्यानंतर हरियाणा, पंजाब, राजस्थानसारख्या राज्यांत कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे, तर गुजरात आणि तेलंगणाच्या कापूसपट्ट्यातही अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादनावर परिणाम होणार आहे.

जुलैअखेरपर्यंत देशभरात 121.13 लाख हेक्टरवर कापूस पिकाची पेरणी करण्यात आली. मागील खरीप हंगामात ती 113.51 हेक्टरवर करण्यात आली होती. यावर्षी त्यामध्ये थोडी वाढ झाली. अतिवृष्टीसह गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कमी कापूस उत्पादनाची टांगती तलवार कापड उद्योगावर घोंगावत आहे.

जागतिक पातळीवर सर्वाधिक कापूस लागवड भारतात केली जाते. अमेरिकेचा सर्वाधिक कापसाच्या लागवडीत दुसरा नंबर लागतो. परंतु, यावर्षी अमेरिकेतील टेक्साससह अन्य कापूस उत्पादक राज्ये भीषण दुष्काळाला सामोरी जात असल्यामुळे कापूस उत्पादनात 20 टक्क्यांनी घट येण्याचा अंदाज आहे.

त्यानंतर चीन व पाकिस्तानमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते. परंतु, संबंधित देशांनाच तेथील उद्योगासाठी तो अपुरा पडणार आहे. चीन आपल्या कापसाबरोबरच जागतिक बाजारातून कापूस आयात करतो. परिणामी, कमी उत्पादनामुळे जागतिक बाजारपेठेत कापसाच्या दरामध्ये तेजी राहणार, हे निश्चित आहे. चीनने यापूर्वीच पाकिस्तान व बांगला देश आदी देशांमध्ये कापड उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात जागतिक बाजारपेठेतून कापसाची खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे कापसाची मागणी वाढली आहे.

भारतातील कापूस दरात राहणार तेजी

शेजारील बांगला देश हा कापसाचा मोठा आयातदार देश आहे. कारण, स्वस्तात मजूर उपलब्ध असल्यामुळे चीनने येथील उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. परंतु, बांगला देशमध्ये कापसाचे फारसे उत्पादन होत नाही. परिणामी, त्यांना इतर देशांतील कापसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे भारतातील कापूस दरात तेजी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूतगिरण्यांना ऊर्जितावस्था कधी येणार?

सध्या राज्यातील अनेक सहकारी सूतगिरण्या चालविणे तारेवरील कसरत बनली आहे. अनेक सूतगिरण्या बंद पडल्या आहेत, तर अनेक बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशातच कापूस दरवाढीचा परिणाम कापड उत्पादनावर होताना दिसत आहे. त्याचबरोबर अनेक सूतगिरण्यांमध्ये कामगार कपातीचे धोरण अवलंबले आहे. काही गिरण्यांमध्ये कामगार पगार कपातीचे धोरण आहे. त्यामुळे सरकारने याप्रकरणी त्वरित लक्ष घालून सूतगिरण्यांना ऊर्जितावस्था देणे गरजेचे बनले आहे.

Back to top button