इचलकरंजी : शिंदे गटाच्या हातातही कमळ? | पुढारी

इचलकरंजी : शिंदे गटाच्या हातातही कमळ?

इचलकरंजी ; विठ्ठल बिरंजे : दहीहंडी, गणेशोत्सवाच्या निमित्ताने पक्षीय पातळीवर महापालिका निवडणुकीचे ‘लाँचिंग’ सुरू झाले. भाजपच्या नेतृत्वाखाली जिल्हा ताराराणी पक्ष मैदानात उतरण्याचे संकेत मिळत असताना, शिंदे गटानेही यात उडी घेतली आहे. भाजपने मिशन ‘लोटस’चा नारा दिल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांनीही कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. आता शिंदे गटानेही हाच सूर ओढला आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर इचलकरंजीतील शिवसेना आणि माने गटात चलबिचल सुरू होती. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरे यांंच्यासोबत ठामपणे राहण्याची भूमिका घेतली; तर खा. धैर्यशील माने गटाची कोंडी झाली होती. काही दिवसांपूर्वी खा. माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होऊन कोंडी फोडली. मात्र, महापालिका निवडणुकीत काय करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. शुक्रवारी खा. धैर्यशील माने यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. सुरेश हाळवणकर यांची भेट घेऊन महापालिका निवडणुकीसंदर्भात प्राथमिक चर्चा केली. त्यामुळे शिंदे गटही भाजपसोबतच राहणार, हे स्पष्ट झाले आहे.

सध्या खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाला मिळणार, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयातील फैसला कधी होईल, हे अनिश्चित आहे. त्यामुळे शिंदे गटाला भाजपच्या कमळ चिन्हावरच निवडणूक लढवावी लागणार, हे निश्चित मानले जात आहे.

Back to top button