कोल्हापूर हद्दवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात | पुढारी

कोल्हापूर हद्दवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

कोल्हापूर : राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमध्ये लोकसंख्येअभावी कोल्हापूरचा समावेश होत नाही. त्यामुळे निधी मिळत नाही. शहराच्या विकासासाठी हद्दवाढ आवश्यक आहे, असा अहवाल महापालिका प्रशासनाने शुक्रवारी राज्य शासनाला पाठविला. यापूर्वी हद्दवाढीचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केलेल्या तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात हद्दवाढीचा चेंडू गेला आहे.

शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेला पत्र पाठवून हद्दवाढीसंदर्भात माहिती मागविली आहे. 2017 ते आजपर्यंतच्या कालावधीत हद्दवाढ झाली असल्यास माहिती द्यावी. तसेच 2017 मध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती होती तेसुद्धा कळवावे, असेही पत्रात म्हटले आहे. त्यानुसार महापालिकेने 23 जानेवारी 2021 रोजी शहराच्या हद्दवाढीत 20 गावांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावातील माहिती आणि 2015-2020 मधील सभागृहात 81 नगरसेवक असल्याच्या माहितीचा अहवाल महापालिकेने शासनाला पाठविला आहे.

कोल्हापूर महापालिका हद्दवाढीत शिरोली, नागाव, वळिवडे-गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव, वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे, शिये, शिंगणापूर, नागदेववाडी या 18 गावांसह शिरोली एमआयडीसी व गोकुळ शिरगाव एमआयडीसी या औद्योगिक वसाहतींचा समावेश करण्यात आला आहे.

कोल्हापूर शहर हे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र व कर्नाटक दरम्यान असलेल्या मुंबई व पुणे महानगरानंतर असणारे महत्त्वपूर्ण नागरी केंद्र आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोकसंख्या कमी होती. वाहनेही तुलनेने कमी होती. मात्र गेल्या काही वर्षांत कोल्हापूरचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. 60-70 वर्षांत जेवढा भूभाग होता, तेवढ्याच भागात सद्य:स्थितीत सुमारे सहा लाख लोक राहात आहेत. वाहनांची संख्या तीन लाखांवर गेली आहे. शहरात पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती आहे. त्यातूनही व्यापार, व्यवसाय व उद्योग वाढीस लागले आहेत. पोषक वातावरण मिळत असल्याने कोल्हापूर शहराची हद्दवाढ आवश्यक झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे.

कोल्हापूर शहराची लोकसंख्या 5 लाख 49 हजार 236 आहे. हद्दवाढीतील गावांची लोकसंख्या एकत्र केल्यास ती 7 लाख 66 हजार 109 इतकी होते. शहराचे सध्याचे क्षेत्रफळ 66.82 चौरस किलोमीटर असून हद्दवाढीनंतर ते 189.24 चौ. कि. मी. होणार आहे. याचा मोठा फायदा कोल्हापूर शहर व हद्दवाढीत येणार्‍या गावांना मिळणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांमधून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार आहे.

Back to top button