कोल्हापूर : शहरात गर्दीचा महापूर! | पुढारी

कोल्हापूर : शहरात गर्दीचा महापूर!

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांच्या खंडानंतर करवीरवासीयांनी शुक्रवारी रात्री दहीहंडीचा थरार अनुभवला… अलोट गर्दीने सर्वच रस्ते, प्रमुख चौक ओसंडून वाहत होते. रस्त्यांना जणू गर्दीचा महापूरच आला होता… तरूणाईचा सळसळता उत्साह, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, ताल धरायला लावणारा ठेका अन् गोविदांच्या गजरात दहीहंडीचा थरार रात्री उशिरापर्यंत रंगला होता. चौहोबाजूला गर्दीच गर्दी झाल्याने वाहतूक यंत्रणाही ठप्प झाली होती. शहराशिवाय उपनगरातही रस्त्यांवर दुतर्फा वाहनांचे जथ्थेच्या जथ्थे दिसून येत होते.

मध्यवर्ती दसरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, गुजरी पेठ, बिंदू चौक, मिरजकर तिकटी,पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळा टॉवरसह तोरस्कर चौक गर्दीने अक्षरश: फुलले होते. सुर्य मावळतीला लागल्यानंतर रस्त्या- रस्त्यांसह चौका- चौकात जल्लोष सुरू झाला. शहराच्या दिशेने येणार्‍या सर्वच प्रमुख रस्त्यावर माणसांचे जथ्थे दिसू लागले.

वरिष्ठाधिकार्‍यांसह फौजफाटा रस्त्यावर

रात्री साडे आठनंतर गर्दी वाढतच राहिल्याने प्रमुख मार्गावरील वाहतूक यंत्रणा ठप्प झाली. आपसुक सर्वच रस्ते वाहनांसाठी बंद झाले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्यासह चारही ठाण्यांतील साडे तीनशेवर, शहर वाहतूक शाखेतील दीडशेवर पोलिसांचा फौजफाटा नियंत्रणासाठी रस्त्यावर डेरेदाखल झाला होता. रात्री साडेनऊनंतर तर शहर, उपनगरातील रस्त्यांना गर्दीच्या महापुराचे स्वरूप आले होते.

पोलिसांची करडी नजर !

दहीहंडीला झालेल्या अलोट गर्दीच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार होवू नये, यासाठी पोलिस यंत्रणेने कमालीची खबरदारी घेतली होती. गर्दीच्या सर्वच ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांचा पहारा तैनात केला होता. चेनस्नॅचरसह सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर स्थानिक गुन्हे अन्वेषणसह गुन्हे प्रगटीकरण पथकामार्फत करडी नजर ठेवली होती.

Back to top button