थर नेत्यांनी रचले, तरी सत्तेची हंडी मात्र जनताच फोडणार | पुढारी

थर नेत्यांनी रचले, तरी सत्तेची हंडी मात्र जनताच फोडणार

कोल्हापूर चंद्रशेखर माताडे : दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गेल्या काही वर्षांत दहीहंडी राजकीय शक्तिप्रदर्शनाचे केंद्रस्थान बनल्याने दहीहंडीच्या माध्यमातून बक्षिसांची रक्कम आणि दहीहंडीची उंचीही वाढत आहे. यानिमित्ताने उंच थर लावणार्‍यांनाही बक्षिसे दिली जात आहेत. यातून राजकीय थरही रचले जात आहेत. विशेषत; जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते थर रचत असले, तरी सत्ता कोणाच्या हातात द्यायची, याची हंडी जनताच फोडणार आहे.

महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर साखर कारखाने, सहकारी बँकांच्याही निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्ष व नेत्यांच्या जोर-बैठका सुरू आहेत. निवडणुका तोंडावर असताना सण सुरू झाले आहेत. त्याची जोरदार तयारी सुरू आहे.

शक्तिप्रदर्शनाचे केंद्र

कोल्हापुरातील दहीहंडीचे सोहळे हे नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनाची केंद्रस्थाने ठरली आहेत. त्यांच्या जागाही ठरल्या आहेत. गर्दी जमविण्यासाठी लागणारे करमणुकीचे कार्यक्रम घेण्यापासून ते आपल्यामागे किती राजकीय ताकद आहे, हे दाखविण्यासाठी गावागावांतून कार्यकर्त्यांना आणले जाते. आता तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याला जोर आला आहे. त्याची पूर्वतयारी जोरात आहे. करमणुकीच्या कार्यक्रमांची रेलचेल करून आकर्षक व नेत्रदीपक विद्युत रोषणाईद्वारे गर्दी खिळवून ठेवण्याचे कसब सगळ्याच आयोजकांनी व्यवस्थित दाखवले आहे.

चर्चेला ऊत

लोकांमध्ये याची चर्चा होतच असते. बक्षिसांच्या रकमेपासून ते कोणी दहीहंडी किती उंचीवर लावली? त्याचे थर किती ? हंडी फुटत नसल्याने ती परत किती खाली घेण्यात आली? कोणाचा करमणुकीचा कार्यक्रम चांगला होता? याबरोबरच कोणाकडे गर्दी जास्त होती व कोणत्या मंडळाकडे जास्त नेते आले, याची खुमासदार चर्चा रंगत असते. त्यापाठोपाठ येणार्‍या गणेशोत्सवात कोण मागे पडले, याची कसर भरून काढली जाते. गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकांमध्ये ते दिसून येते.

नेत्यांचा दबदबा

दसरा चौकात खासदार धनंजय महाडिक यांची, मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची, मिरजकर तिकटी येथे शिवसेनेचे दक्षिण विभागप्रमुख रविकिरण इंगवले यांची, तर गुजरी कॉर्नर चौकात किरण नकाते यांनी दहीहंडी आयोजनात पुढाकार घेतला आहे. राहुल आवाडे यांनी इचलकरंजीत सर्वाधिक बक्षिसाच्या दहीहंडीचे आयोजन केले आहे. त्यामुळे मंडळांची नावे गायब होऊन नेत्यांच्या नावाने दहीहंडीची ओळख निर्माण झाली आहे.

ईर्ष्या पणाला

गणेशोत्सवापूर्वीचा पहिला टप्पा म्हणून दहीहंडीच्या शक्तिप्रदर्शनाकडे पाहिले जात असल्याने व दोन वर्षांनंतर राजकीय ताकद दाखविण्याची संधी मिळाल्याने ईर्ष्या पणाला लागली आहे. राजकारणातील हंडीसाठी थर लावण्याचे काम नेत्यांनी केले आहे; मात्र सत्तेची हंडी जनताच फोडणार असून सत्तेवर कोणाला बसवायचे, याचा निर्णय जनताच घेणार आहे.

हेही वाचा

Back to top button