पंचवीस वर्षांपासून राष्ट्रध्वज मोफत इस्त्री; शिरटीतील महादेव बन्ने यांच्यावर कौतुकांचा वर्षाव | पुढारी

पंचवीस वर्षांपासून राष्ट्रध्वज मोफत इस्त्री; शिरटीतील महादेव बन्ने यांच्यावर कौतुकांचा वर्षाव

शिरटी (कोल्‍हापूर), पुढारी वृत्‍तसेवा : शिरटी ( ता. शिरोळ ) येथील महादेव शिवाप्पा बन्ने हे गेल्या २५ वर्षांपासून शिरटी परिसरातील नागरिकांना स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी मोफत राष्ट्रध्वज इस्त्री करून देतात. बन्ने यांनी शिरटी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात १९९७ साली आपल्या लॉंड्री व्यवसायास सुरवात केली. गेल्या २५ वर्षांपासून त्यांनी शिरटी परिसरातील विविध सहकारी संस्था,शाळा, शासकीय कार्यालये तसेच विविध तरुण मंडळांना मोफत तिरंगी ध्वज इस्त्री करून देण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. त्यामुळे शिरटी परिसरातून बन्ने यांचे कौतुक होत आहे.

बन्ने हे अतिशय मनमिळावू व प्रामाणिक स्वभावाचे आहेत. शेतमजुरी करून आपला लॉंड्रीचा व्यवसाय करतात. राष्ट्रध्वज हा देशाची शान असून त्याचे पावित्र्य जपणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र दिन आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शिरटी परिसरात ध्वज कुठे इस्त्री करायचा म्हटल्यानंतर आपसुकतेने महादेव बन्ने यांचे नाव समोर येते.

राष्ट्रध्वज इस्त्री करून नेण्यासाठी आलेले लोक पैसे देण्यासाठी हात पुढे करतात, तेव्हा बन्ने हे पैसे घेण्यास नकार देतात. शेतमजूर असूनही कितीही अडचण असली तरी त्याचे कोणतेही पैसे स्वीकारत नाहीत. तसेच या दोन दिवसांच्या काळात ज्यादा कपडे असल्याने ते रात्रभर इस्त्री करतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला देखील आवर्जून उपस्थित राहतात.

हेही वाचा 

Back to top button