लाचखोर मनपा लिपिकास रंगेहाथ पकडले | पुढारी

लाचखोर मनपा लिपिकास रंगेहाथ पकडले

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील कर्मचारी महिलेची वैद्यकीय बिलाची फाईल विनात्रुटी पडताळणीसाठी 1 हजार रुपयांची लाच घेताना महापालिकेतील लिपिक बाबासाहेब अण्णा माळी (वय 58, रा. रुकडी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. महापालिकेच्या जुन्या इमारतीत दुपारी 4.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

इचलकरंजी महापालिकेत तक्रारदार यांच्या आई नोकरीस आहेत. त्यांनी वैद्यकीय बिल पडताळणी करण्यासाठी पालिकेत दिले होते. हे बिल पाणीपुरवठा विभागातील लिपिक माळी यांच्याकडे तपासणीसाठी आले होते. ते बिल विनात्रुटी पडताळणी करून मिळण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे 1 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारीची पडताळणी करून शुक्रवारी सापळा लावण्यात आला होता. महापालिकेच्या जुन्या इमारतीत विभागीय कार्यालयात माळी हा ध्वज वाटपाच्या कामासाठी आला होता.

यादरम्यान तक्रारदाराने माळी याची भेट घेऊन काम करून देण्याची विनंती केली. माळी याने 1 हजार रुपयांची मागणी केली. लाचेची रक्‍कम स्वीकारत असताना त्यास पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पो. ना. विकास माने, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, पो.हे. कॉ. विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.

Back to top button