सैनिक टाकळी : महायुद्धापासून सुरू झालेला प्रवास आजही अखंडित | पुढारी

सैनिक टाकळी : महायुद्धापासून सुरू झालेला प्रवास आजही अखंडित

नृसिंहवाडी : विनोद पुजारी सैनिक टाकळीची सैनिकी परंपरा ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली आहे. याची सुरुवात झाली ती पहिल्या महायुद्धात. त्याकाळी गावात देशी व मर्दानी खेळ खेळले जात असत. कुस्ती, मलखांब, लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी आदी मर्दानी खेळांमुळे अंगात रग असायची. पिळदार बाहूंचे उंचेपुरे तरुण शेतात घाम गाळत असत. सैन्यात भरती होण्याची उर्मी या तरुणांमध्ये निर्माण झाली होती. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस हे तरुण सैन्यदलात भरती झाले. इथून सुरू झालेला हा प्रवास अखंडित सुरूच आहे.

1914 ते 1919 दरम्यान झालेल्या पहिल्या महायुद्धात टाकळीचे 6 जवान शहीद झाले. यात बाबू जाधव, खंडू जाधव-नावलकर, कृष्णा भुजंगा जाधव, कृष्णा नाना जाधव, संभाजी वाळके, यशवंत पाटील या थोर सुपुत्रांनी युद्धभूमीवर प्राणार्पण केले. युद्धसमाप्‍तीनंतर सैनिक टाकळीचे काही जवान मायभूमीत परतले, तर काही परागंदा झाले. एवढ्या वर्षांत आपल्या माणसाचा थांगपत्ता लागला नाही, म्हणून अनेक कुटुंबांनी त्यांचे पिंडदानही केले. मात्र, काही जिगरबाज महिलांनी पतीचे प्रेत पाहिल्याशिवाय कुंकू पुसणार नाही, अशी शपथ घेतली व ती शेवटपर्यंत पाळली.

दुसर्‍या महायुद्धाच्या काळातही सैनिक टाकळीच्या जवानांनी पराक्रमाची शर्थ केली. यात हवालदार तुकाराम केशव पाटील, रघुनाथ पाटील, ज्ञानू पाटील, भीमराव गणू पाटील हे सुपुत्र युद्धभूमीवर धारातीर्थी पडले. सुभेदार मेजर सखाराम तांबवेकर, ऑनररी लेफ्टनंट सिद्धू पाटील, नाईक पुंडलिक पाटील, नाईक सखाराम चावरे यांच्या साहसामुळे तत्कालीन बि—टिश सरकारमार्फत त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी झालेल्या युद्धात हवालदार तुकाराम केशव पाटील यांचे शिर धडापासून वेगळे झाले होते. तरीही शिर नसलेले धड काही मिनिटे गोळीबार करीत राहिले. शत्रूच्या काळजात धडकी भरविणारा हा प्रसंग होता. बि—टिश सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना मरणोत्तर पुरस्कार देऊन त्यांच्या मातोश्रींना रोख 7 हजारांचे बक्षीस व पेन्शन सुरू केली होती. त्यामुळे युद्धभूमीवर साक्षात मृत्यू समोर असतानाही त्याला भिडायचे कसे? याचा वस्तुपाठच नव्या पिढीला मिळत गेला.

या सर्व सैनिकांना बि—टिश सैन्यात नोकरी करावी लागत होती; पण दुसर्‍या महायुद्धानंतर सैनिक टाकळीतील अनेक तरुणांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. यातूनच अनेक जवानांनी इंग्रजांच्या नोकरीचा त्याग करून प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीत आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत प्रवेश केला. त्यामध्ये ज्ञानदेव जाधव, सखाराम पाटील, दादू पाटील, दत्तू जाधव, बच्चाराम पाटील यांचा उल्‍लेख केला जातो. यातील सुभेदार मेजर ज्ञानदेव जाधव हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अंगरक्षक होते, असे सांगितले जाते.
भारताला स्वातंत्र्य मिळालेला 15 ऑगस्ट 1947 चा तो दिवस सैनिक टाकळी गावाने मोठ्या उत्साहात साजरा केला होता. स्वातंत्र्य मिळाल्याच्या स्मरणार्थ अनेकांनी पिंपळाची, वडाची झाडे लावली होती. आज सैनिक टाकळी गावात ही डौलदार झाडे भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या आठवणी जागवीत आहेत. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात भारताने लढलेल्या प्रत्येक युद्धात सैनिक टाकळीचा जवान सहभागी होता.

Back to top button