कोल्हापूरवर महापुराचे सावट | पुढारी

कोल्हापूरवर महापुराचे सावट

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा पंचगंगा नदीच्या पूर पातळीत संथ गतीने वाढ सुरूच आहे. पाणी पातळी संथ गतीने वाढत गुरुवारी रात्री 11 पर्यंत 41.8 फुटांवर पोहोचल्याने कोल्हापूरकरांवर महापुराचे सावट कायम आहे. पंचगंगा धोक्याच्या पातळीजवळ आल्याने नागरिकांची धाकधूक वाढली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी धरणाचे एकूण पाच स्वयंचलित दरवाजे खुले असून त्यातून 8 हजार 740 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूर-पन्हाळा मार्ग वाहतुकीसाठी दुसर्‍या दिवशीही बंद राहिला. गुरुवारी कसबा बावडा – शिये, कदमवाडी – मार्केट यार्ड हे दोन रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली असून एकूण 54 मार्गावरील वाहतूक बंद आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गुरुवारी पावसाने उघडीप दिली. मात्र जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. राधानगरी आणि दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळी सात ते सायंकाळी चार या आठ तासांत अतिवृष्टी झाली. राधानगरी परिसरात 90 मि.मी. तर दूधगंगा परिसरात 70 मि.मी. पाऊस झाला. जोरदार पावसाने राधानगरीच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली.

राधानगरी धरणाचा 4 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा गुरुवारी पहाटे 4 वाजून 19 मिनिटांनी बंद झाला. यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत पाच आणि सहा क्रमांकाचे दोनच दरवाजे खुले होते. गुरुवारी सायंकाळी 4 वाजून 11 मिनिटांनी तिसर्‍या क्रमांकाचा आणि 4 वाजून 15 मिनिटांनी 4 क्रमाकांचा दरवाजा खुला झाला. त्यानंतर पाच वाजता सातव्या क्रमांकाचा दरवाजा खुला झाला. धरणाचे पाच दरवाजे खुले झाल्याने त्यातून वीज निर्मितीसह एकूण 8 हजार 740 क्यूसेक विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. यामुळे भोगावतीची पाणी पातळी वेगाने पुन्हा वाढ होऊ लागली आहे. परिणामी पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

तुळशी धरण 93 टक्के भरले

तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या 24 तासात 112 मि.मी. पाऊस झाला. यामुळे धरण आज सकाळी सात वाजता 93 टक्के भरले. त्यामुळे धरणातून गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून 500 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. राधानगरीसह तुळशी, कुंभी, कासारी आणि कोदे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत संथ वाढ गुरुवारी सुरूच होती. पंचगंगेची पातळी बुधवारी रात्री 12 वाजता 41.4 फुटांवर होती. यानंतर पाणी पातळी वाढीचा वेग कमी झाला. गुरुवारी रात्री एक वाजता ती 41.5 फुटांवर, पहाटे पाच वाजता 41.6 फुटांवर, सकाळी नऊ वाजता 41.7 फुटांवर तर दुपारी तीन वाजता ती 41.8 फुटांवर गेली. रात्री नऊ वाजेपर्यंत ती 41.8 फुटांवरच स्थिर होती. पंचगंगा धोका पातळीजवळ (43 फूट) आहे. त्यातच राधानगरीसह चार धरणांतून विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातूही शुक्रवारी सकाळी दहापासून 8 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. यामुळे पावसाचा जोर कमी झाला तरी पंचगंगेची पाणी पातळी वेगाने कमी होईल अशी स्थिती नाही. यामुळे कोल्हापूरवर महापुराचे सावट कायम आहे.

सर्वच धरणांतून विसर्ग सुरू

जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांपैकी 14 धरणांतून विसर्ग सुरू होता. गुरुवारी तुळशीतूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यामुळे सर्वच धरणातून गुरुवारपासून विसर्ग सुरू झाला आहे. वारणा धरणातून 9 हजार 400 तर दूधगंगा धरणातून 4 हजार 772 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

दहा धरण क्षेत्रात अतिवृष्टी

गुरुवारी सकाळी सात वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत प्रमुख 15 धरणांपैकी 10 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. कडवी (57), पाटगांव (60), चिकोत्रा (45), आंबेओहळ (45) व कोदे (57 मि.मी.) या धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला. राधानगरीत 90 मि.मी., तुळशी आणि वारणा परिसरात प्रत्येकी 112 मि.मी., दुधगंगेत 174 मि.मी., कासारीत 87 मि.मी., चित्रीत 120 मि.मी., जंगमहट्टीत 143 मि.मी., घटप्रभेत 135 मि.मी. पावसाची नोंद झाली.

आजर्‍यात अतिवृष्टी

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 26.1 मि.मी. पाऊस झाला. आजर्‍यात अतिवृष्टी झाली. तिथे सर्वाधिक 65 मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरी तालुक्यात 63 मि.मी. इतका झाला. गगनबावड्यात 55.4, चंदगडमध्ये 52.7, शाहूवाडीत 38.1, भुदरगडमध्ये 32.4, शाहुवाडी 28.7, कागलमध्ये 14.1, गडहिंग्लजमध्ये 12.7, करवीरमध्ये 8.8, हातकणंगले 3.4 तर शिरोळमध्ये 1.3 मि.मी. पावसाची नोंद झाली.

54 मार्गांवरील वाहतूक बंद

 कोल्हापूर-वैभववाडी (करुळ घाटात दरड कोसळल्याने)
कोल्हापूर-रत्नागिरी (केर्लीनजीक पाणी आल्याने)
चिखली-शिंगणापूर, चिखली-वरणगे, निढोरी-गोरंबे, शिरढोण पूल, सोनगे-चिखली.
कसबा बावडा-शिये, कदमवाडी-जाधववाडी
यासह एकूण 54 मार्गांवरील वाहतूक बंद आहे.

Back to top button