कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांपैकी 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवाँधार पावसाने धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. यामुळे 15 पैकी 13 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. दुपारनंतर त्यात आणखी वाढ झाली. दूधगंगा धरणाचे पाच, तर कुंभी धरणाचा एक वक्राकार दरवाजा उघडण्यात आला आहे.

पाऊस आणि धरणांतून सोडण्यात येणार्‍या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने कर्नाटकातील अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासांत वारणा (64 मि.मी.) वगळता सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. कुंभी धरण परिसरात तर यावर्षीच्या आजपर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. या परिसरात 24 तासांत 310 मि.मी. पाऊस झाला. घटप्रभा धरण परिसरात 214 मि.मी., तर कोदे परिसरात 207 मि.मी. पाऊस झाला. राधानगरीच्या पाणलोट क्षेत्रात 150 मि.मी. पाऊस झाला. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. धरण सोमवारी सकाळी सात वाजता 86 टक्के भरले.

पाटगाव धरण परिसरात 170 मि.मी. पाऊस झाला. हे धरण 86 टक्के भरले आहे. यामुळे या धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांपैकी तुळशी आणि चिकोत्रा धरण वगळता सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वारणा धरणातून 1 हजार 675 क्यूसेक विसर्ग सुरू होता, दुपारी तो 3 हजार क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला. कासारी धरणातून 550 क्यूसेक विसर्ग सुरू होता, तो सकाळी साडेनऊनंतर 750 क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला. कुंभी धरणाचा वक्र दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यातून 600 क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे. यासह धरणातून एकूण 900 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

जिल्ह्यातील चार धरणे यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राधानगरी धरण सायंकाळपर्यंत 90 टक्क्यांपर्यंत गेले होते. दुपारी दोन वाजता दूधगंगा धरणाचे पाच वक्राकार दरवाजे उघडण्यात आले. त्यातून 423 क्यूसेक, तर वीजनिर्मितीसाठी 1 हजार क्यूसेक, असा धरणातून 1,423 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. दूधगंगा धरण वगळता उर्वरित सर्वच धरणांत 83 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर आणखी दोन-तीन दिवस कायम राहिला, तर जिल्ह्यातील दूधगंगा आणि वारणा वगळता बहुतांशी धरणे पूर्ण क्षमतेने भरतील, अशी शक्यता आहे.

अलमट्टी’तून 72,500 विसर्ग

अलमट्टी धरणात 117.38 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणी पातळी सकाळी 519.27 मीटर इतकी होती. धरणात सकाळी 37 हजार 41 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तो वाढत गेल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग 42 हजार 500 क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला. नंतर तो 72 हजार 500 क्यूसेकपर्यंत नेण्यात आला.

धरण क्षेत्रांतील 24 तासांतील पाऊस (मि.मी.मध्ये)

राधानगरी (150), तुळशी (130), वारणा (64), दूधगंगा (123), कासारी (158), कडवी (120), कुंभी (310), पाटगाव (170), चिकोत्रा (130), चित्री (110), जंगमहट्टी (122), घटप्रभा (214), आंबेओहोळ (73), जांबरे (103) व कोदे (207).

शिरोळ तालुक्यातील नदीकाठ धास्तावला

गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट व धरण क्षेत्रांत होत असलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा या चार नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पंचगंगेवरील तेरवाड, शिरोळ दूधगंगेवरील दत्तवाड, मलिकवाड, कृष्णेवरील कनवाड, राजापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोयना, अलमट्टी धरणांची भरतीकडे वाटचाल सुरू असल्याने अतिपाऊस झाला, तर महापूर येऊ शकतो. त्यामुळे शिरोळ तालुक्याला पुन्हा एकदा महापुराची धास्ती लागून राहिली आहे.

वारणा नदीच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असून, रविवारी सायंकाळी 23 फुटांवर पाणी पातळी पोहोचली आहे. तर कृष्णेचे पाणी चार फुटांनी वाढल्याने उदगाव येथे पातळी 14 फुटांवर गेली आहे. येथून राजापूर बंधार्‍याकडे 27 हजार 700 क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तर कर्नाटकात 72 हजार 500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग शिरोळ तालुक्यातून जात आहे. सध्या वाढत असलेल्या पाण्यामुळे मात्र नदीकाठावर आता धास्ती निर्माण होत आहे.

कुरूंदवाड : कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या धरण व पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कृष्णेच्या पाणी पातळीत 6 फुटांनी वाढ होऊन 23 फूट 3 इंच पाणी पातळी झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 13 फूट 6 इंचाने वाढ होऊन ती 33 फूट 8 इंच इतकी झाली आहे.

इचलकरंजीत पंचगंगा 55 फुटांवर

दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सोमवारी नदीच्या पाणी पातळीत 5 फुटांनी वाढ झाली. सायंकाळी ही पातळी 55 फुटांवर पोहोचली होती. पावसाची संततधार सुरूच राहिल्यास पंचगंगा नदी पात्राबाहेर पडून जुना पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जुलैमध्ये दमदार बरसलेल्या पावसामुळे जुना पूल पाण्याखाली गेला होता. पाणी पात्राबाहेर पडून नागरी वस्तीकडे सरकत होते. मात्र, पावसाने उघडीप दिल्यामुळे पुराचे पाणी ओसरले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरासह धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ होत आहे. सोमवारी सकाळी पाण्याची पातळी 51 फूट होती, तर सायंकाळी ती 55 फुटांवर गेली. एका दिवसात तब्बल 5 फुटांनी पाणी वाढल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास पाणी झपाट्याने वाढणार आहे.

हातकणंगलेतही दमदार

पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर हातकणंगले परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे. सोमवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ऊस, भात पिकाला संजीवनी ठरला आहे. मात्र, या पावसाने व्यापारी व प्रवाशांची तारांबळ उडाली होती. दिवसभराच्या पावसाने पेठा विभागावर दिसणारी गर्दी खूपच कमी होती.

सोमवारी दिवसभर पावसाची हजेरी होती. दिवसभराच्या रिपरिपीमुळे ओढ्यांना पाणी आले असून, वारणा व पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. या पावसाने व्यापारीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. दिवसभर माणसांनी घर सोडले नसल्याने ग्राहकांची वर्दळ कमी होती. तहसील कार्यालयाकडेही नागरिकांचा ओढा कमीच होता. या पावसाचा परिणाम शेतीवरही झाला असून, पावसाने भुईमूग, भाजीपाला पिकाला कमालीचा गारवा निर्माण झाल्याने शेतकरीवर्गाचे नुकसान झाले आहे. मात्र, या पावसाने ऊस पिकाला फायदा झाला आहे.

हातकणंगले ते इचलकरंजी रस्त्यावरील भूमिगत रेल्वे पूल गेट क्र. 17 च्या कामाला तब्बल सात ते आठ महिने होऊनही काम अपुरे आहे. या पावसाने पुलाखाली पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुसर्‍या बाजूला खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची कसरत होत आहे.

Back to top button