साखर कारखान्याच्या गोडाऊनवर छापा टाका : राजू शेट्टींची जीएसटी विभागाकडे मागणी

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अनेक साखर कारखाने काटामारी करून शेतकर्‍यांची फसवणूक करत आहेत. मोठ्या प्रमाणात उसात काटामारी करून साखरेची चोरी केली जात आहे. त्याची जीएसटी न भरता साखरेची परस्पर विक्री होत असून, तातडीने साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर छापा टाकून तपासणी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जीएसटीचे सहआयुक्त श्रीमती वैशाली काशीद जीएसटी उपायुक्त कोल्हापूर यांच्याकडे केली आहे.

याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, राज्यामधील साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस वजन करत असताना सर्रास काटामारी करतात. एकूण वजनाच्या १० टक्के इतकी काटामारी केली जाते. हे आमच्या निदर्शनास आले आहे. काटामारीमुळे केवळ शेतकर्‍यांचेच नुकसान होत नसून यातून उत्पादीत झालेली साखर चोरून परस्पर विकली जात असल्याने त्यावरील जीएसटी बुडवून शासनाचेही नुकसान केले जात आहे. महाराष्ट्रात गेल्यावर्षी १३ कोटी २० लाख टन इतक्या उसाचे उत्पादन झाले. त्याच्या १० टक्के म्हणजे १ कोटी ३२ लाख टन उसाची चोरी झाली, व त्यापासून उत्पादीत झालेली १४.७८ लाख टन साखर विना जीएसटी साखर विकली गेली आणि त्यामुळे २२९ कोटी रूपयांची जीएसटी बुडवला गेला आहे.

कोल्हापूर विभागाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, २ कोटी ५५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २५ लाख ५० हजार टन ऊस काटामारीतून चोरला गेला. त्यापासून तयार झालेली ३ लाख १६ हजार टन साखर चोरून विकली गेली. यामधून ४८.९० कोटी रुपयांचा जीएसटी बुडविला गेला आहे. उसात काटामारी करून राज्यात सरासरी ४५८१ कोटींचा दरोडा टाकला जात आहे. चोरीच्या साखरेची विक्री बेकरी, दुग्धजन्य पदार्थ, किरकोळ व्यापारी यांच्यामार्फत चोरून विक्री केली जाते. यातील थेट पैसा चोरांच्या घशात जात आहे, असा आराेपही त्‍यांनी केला.

साखर कारखानदार हे मोठे राजकीय नेते आहेत. म्हणून त्यांनी राजरोसपणाने कर चोरी करावी का ? असा काही कायदा नाही. आपल्या खात्याकडून छोट्या- मोठ्या व्यापार्‍यांच्यावर सर्रास धाडी टाकून कारवाई केली जाते. मग हे धनदांडगे मोकाट का? यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्‍यांनी केली.

साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर अचानक छापा टाकून त्यांचे हिशेब तपासावेत. या चोर्‍या थांबल्या तर आपल्या विभागाचा महसूल वाढेल आणि शेतकर्‍यांची लूट थांबेल. या संदर्भातील सर्व माहिती द्यायला शेतकरी पुढे येतील, त्यासाठी आपण कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Exit mobile version