गोकुळ जिल्हा दुध संघाच्या ऑनलाईन सभेला विरोधकांना अटकाव? | पुढारी

गोकुळ जिल्हा दुध संघाच्या ऑनलाईन सभेला विरोधकांना अटकाव?

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर गोकुळ जिल्हा दुध उत्पादक संघाची (गोकुळ) 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 24 सप्टेंबरला दुपारी एक वाजता संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात 50 जणांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सभेसाठी शुक्रवारी (दि.27) नोटीस देऊन 31 ऑगस्टपर्यंत चार दिवसांत नोंदणी करण्याची सूचना केली आहे. विरोधी आघाडीचा कमीत कमी सहभाग सभेत व्हावा, यासाठीच दोन सुट्ट्यांसह कमी अवधी दिल्याची चर्चा आहे.

गोकुळ जिल्हा दुध संघाच्या मागील काही सभा राजकीय इर्ष्येेमुळे गाजल्या होत्या. संचालकांना खर्च, मल्टिस्टेटच्या मुद्द्यावरून तत्कालीन विरोधकांनी सभा उधळून लावल्या होत्या. सत्तांतरानंतर ‘गोकुळ’मध्ये मोठे प्रशासकीय बदल झाले. ठेकेदार बदलले. दूध वाहतुकीचे दर कमी झाले. ‘गोकुळ’मध्ये सत्ताधार्‍यांकडून येत्या काही वर्षांत सुमारे अडीचशे कोटी रुपयांचे प्रकल्प हातात घेतले जाणार आहेत. विरोधक या मुद्द्यावरून सत्ताधार्‍यांना सभेत जाब विचारण्याची शक्यता आहे.

सत्तांतरानंतर कोरोनाच्या कारणाने सभा ऑनलाईन घेत, विरोधकांची कोंडी करण्याची संधी सत्ताधार्‍यांना मिळाली आहे. यातच संस्था सभासदांना ऑनलाईन सभेत सहभागी करताना अत्यंत कमी अवधी दिल्याची चर्चा आहे. शुक्रवारी (दि. 27) सभेची नोटीस बजावली. त्यानंतर शनिवार आणि रविवार अशी सुट्टी असूनही 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्यास सांगितले आहे. कमीत कमी विरोधकांचा ऑनलाईन सभेत सहभाग असावा, याची पद्धतशीर काळजी घेतल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.

सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी पात्र संस्था प्रतिनिधींनी अँड्राईड मोबाईल नंबर, व्हॉटस् अ‍ॅप, ई-मेल आयडी इत्यादी माहिती संघ सुपरवायझर यांच्याकडे 31 ऑगस्टपर्यंत द्यावी. संस्थेच्या वतीने ज्यांचा मोबाईल नंबर दिला आहे, त्यांचे नाव प्रतिनिधी (ठराव) म्हणून पाठविण्यात यावे. नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवरून सभेदिवशी लॉगईन होऊन सभेच्या कामकाजात सहभागी होता येईल, असे संस्था सभासदांना पाठवलेल्या पत्रात गोकुळ व्यवस्थापनाने म्हटले आहे.

 

Back to top button