
कोल्हापूर; सागर यादव : भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ असे करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिराला महत्त्व आहे. चालुक्यांच्या काळात इ.स. 700 च्या सुमारासचे म्हणजेच सुमारे 1200 वर्षांपूर्वीचे हे प्राचीन मंदिर असून, अनेक वैशिष्ट्यपूर्ण देवदेवतांची छोटी-मोठी मंदिरे येथे एकवटली असून, यापैकीच एक म्हणजे 'मातृलिंग' मंदिर होय.
अंबाबाई मंदिराच्या स्थापत्य आणि रचनेत अनेक वैशिष्ट्ये आढळतात. इतर अनेक वैशिष्ट्यांपैकी महत्त्वाचे म्हणजे मातृलिंग मंदिर असून, अनेकांना हे नेमके कोठे आहे याची माहिती नाही, तर बहुतेेकांना याबाबतची माहितीच नाही. अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत रचनेत दोन मजले करण्यात आले आहेत. खाली गाभार्यात करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती असून, तिच्या डोक्यावरच म्हणजेच वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे. खाली कासव चौक आणि गर्भगृहात अंबाबाईची मूर्ती आहे. त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावर नंदी आणि गर्भगृहात मातृलिंग आणि चौथर्यावर गणेशाची मूर्ती असून, याच मंदिरावर मुख्य शिखर आहे. मातृलिंग मंदिरात जाण्यासाठी चिंचोळ्या गुप्त पद्धतीच्या पायर्या आहेत. अंबाबाईच्या मूर्तीशेजारी ज्या पद्धतीने तीन वेगवेगळ्या खोल्या आहेत, त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावरसुद्धा छोट्या छोट्या तीन खोल्या आढळतात. त्याला 'ध्यान गृह' असेही म्हटले जाते.
मातृलिंग मंदिरात भक्तांना दररोज दर्शनासाठी प्रवेश दिला जात नाही. वर्षातून तीनवेळा मंदिर उघडले जाते. श्रावण सोमवारी, वैकुंठ चतुर्थी, महाशिवरात्री या तिन्ही वेळा भक्तांसाठी मातृलिंग मंदिर दर्शनासाठी खुले केले जाते. ज्याप्रमाणे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरास पूर्ण प्रदक्षिणा करण्याचा मार्ग आहे, त्याचप्रमाणे मातृलिंगासही पूर्ण परिक्रमा करण्याचा प्रदक्षिणा मार्ग आहे.
पुराणामध्ये भुक्ती-मुक्ती प्रदायक म्हणजेच 'भुक्ती' म्हणजे राज ऐश्वर्य व 'मुक्ती' म्हणजे मोक्ष देणारे स्थान म्हणून अंबाबाई मंदिराला महत्त्व आहे. मातृलिंगाचेा दर्शन म्हणजे प्रतिकैलासाचे दर्शनाप्रमाणे महत्त्व असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सहव्यवस्थापक गणेश नेर्लेकर-देसाई यांनी दिली.