कोल्हापूर : लाडवाडी ग्रामस्थांना मुतखड्याची बाधा; ६०० पैकी २०१ लोक त्रस्त | पुढारी

कोल्हापूर : लाडवाडी ग्रामस्थांना मुतखड्याची बाधा; ६०० पैकी २०१ लोक त्रस्त

धामोड; पुढारी वृत्तसेवा : धामोड पैकी लाडवाडी (ता. राधानगरी) येथील दोनशे एक नागरिकांना मुतखड्याची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाडवाडी येथील प्रत्येक घरात किमान एक- दोन सदस्यांना मुतखड्याचा त्रास जाणवत आहे. मुतखड्याच्या भितीने धामोड परिसरातील नागरिकांच्या भितीचे वातावरण पसरले आहे. क्षारयुक्त पाणी पिल्यामुळे मुतखडा या आजाराला लाडवाडी गावाला सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. तर लाडवाडीला तुळशी नदीतून पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

धामोड पैकी लाडवाडी येथे १००- १२५ घरे असुन येथील लोकसंख्या ६०० ते ७०० आहे. गेल्या सहा महिन्यांपासून गावातील १४ ते ६० वयोगटातील मुले, स्त्रिया, पुरुष यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला आहे. यामुळे येथील नागरिकांनी कोल्हापूर येथील मुत्ररोग तंज्ञांना दाखवून सर्व तपासण्या केल्या. या तपासणीत गावातील २०१ जणांना मुतखडा असल्याचे निदान झाले आहे.

यानंतर लाडवाडी येथील शिक्षक सुरेश लाड यांनी पोटदुखी असलेल्या सर्व व्यक्तींची भेट घेतली असता दोनशे एक जणांना मुतखडा असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत त्यांनी गावच्या नळपाणी पुरवठ्याची चौकशी केली. तर तुळशी नदीकाठावर बांधलेल्या जॅकवेलमध्ये शेत शिवारातील पाणी येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरीत पाण्यातील क्षारांचे प्रमाण तपासावे व तुळशी नदीतून गावाला पाणी पुरवठा करावा अशी मागणी सुरेश लाडसह अमित लाड, संदीप लाड, सचिन लाड आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button