संकेश्वर : शॉर्टसर्किटने मारुती व्हॅनला आग लागून १ लाखाचे नुकसान | पुढारी

संकेश्वर : शॉर्टसर्किटने मारुती व्हॅनला आग लागून १ लाखाचे नुकसान

चिकोडी : पुढारी वृत्तसेवा; मारुती व्हॅनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या दुर्घटनेत गाडीचे १ लाखाचे नुकसान झाले. ही घटना संकेश्वर बसस्थानकासमोरील शिवाजी सर्कल येथे आज सकाळी ११ च्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी घडलेली नाही.

याबाबतची अधिक माहिती अशी की, संकेश्वर शुक्रवारचा बाजार असल्याने केदारी लक्ष्मण कुराडे रा. कडलगे (ता. गडहिंग्लज) हे कडलगेहून संकेश्वरला व्हॅनमधून निघाले होते. मारुती व्हॅन क्रमांक एम एच ०९/बी एक्स २२३२ आहे. शिवाजी सर्कल जवळ चालक केदारी कुराडे यांच्या सीट खाली धूर येऊ लागला. घटनेचे गांभीर्य ओळखून वेळीच ते दरवाजा उघडून बाहेर आले. गाडीने लगेच पेट घेतल्याने लिंक रोडवरील लोकांत सावळा गोंधळ निर्माण झाला. काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपयश आले. हे वृत्त पोलिस व अग्निशामक दलाला कळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचा बंब दाखल होऊन गाडीवर पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली. या व्हॅन मध्ये पेट्रोल व गॅस ची सुविधा होती. ही बाब विचारात घेता अग्निशामक दलाने गॅस टँकर वर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत मारुती व्हॅनचे एक लाखाचे नुकसान झाले आहे

हेही वाचा

Back to top button