कोल्हापूर : अनिकेतचा व्यावसायिक फुटबॉलमध्ये पुढचा टप्पा | पुढारी

कोल्हापूर : अनिकेतचा व्यावसायिक फुटबॉलमध्ये पुढचा टप्पा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रात कोल्हापूरचा स्टार खेळाडू अनिकेत जाधव याने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. ईस्ट बंगाल संघाशी तो करारबद्ध झाला असून पुढील दोन वर्षांसाठी तो या संघाकडून खेळणार आहे. यासाठी त्याला तब्बल 2 कोटी 35 लाख रुपयांचे मानधन मिळणार आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील इतके मानधन घेणारा तो पहिला फुटबॉलपटू आहे. शतकी परंपरा लाभलेल्या कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू म्हणून अनिकेत जाधव याने आपली ओळख निर्माण केली आहे. युवा विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या अनिकेतने आपल्या सर्वोत्कृष्ट खेळात सातत्य राखले आहे.

व्यावसायिक संघात पदार्पणानंतर भारतीय फुटबॉल महासंघाशी 50 हजार व यानंतर जमशेदपूर एफसीने दोन वर्षांकरीता 90 लाख रुपयांनी अनिकेतला करारबद्ध केले होते. पुढे ‘हैदराबाद एफसी’साठी तीन वर्षांकरिता सव्वा कोटी रुपयांचा करार अनिकेतने केला होता. दरम्यान भारतीय संघातही अनिकेतचा समावेश झाला होता. या सर्व संघांकडून खेळताना अनिकेतने उत्कृष्ट कामगिरी केली. याची दखल घेऊन ईस्ट बंगाल फुटबॉल संघाने त्याला पुढील दोन वर्षांकरीता करारबद्ध केले आहे.

सातत्याने सर्वोत्कृष्ट खेळ करणे हे माझे एकमेव ध्येय आहे. यामुळे चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचे सोने करण्यावर भर असेल. माझ्या प्रत्येक यशात कोल्हापूरचे फुटबॉलप्रेमी सदैव माझ्या पाठीशी आहेत. कोल्हापूरच्या नवोदित फुटबॉलपटूंनीही करिअरसाठी व्यावसायिक फुटबॉलकडे जाणे अत्यावश्यक आहे.
– अनिकेत जाधव (फुटबॉलपटू)

Back to top button