शिरोली-उदगाव-अंकली भूसंपादन 2 महिन्यांत सुरू करा | पुढारी

शिरोली-उदगाव-अंकली भूसंपादन 2 महिन्यांत सुरू करा

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील शिरोली-उदगाव-अंकलीपर्यंतच्या मार्गाचेे दोन महिन्यांत भूसंपादन सुरू करून प्रश्‍न मार्गी लावा, असे आदेश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
पेठ-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 945 कोटी रुपयांच्या डीपीआरला मंजुरी देण्याचे आश्‍वासन गडकरी यांनी दिल्याची माहिती खा. धैर्यशील माने यांनी दिली. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग योजनेत सांगली-कोल्हापूर  महामार्ग विलीनीकरण करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील अंकलीपर्यंत त्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित उदगाव ते शिरोली या महामार्गावरील भूसंपादन  रखडल्याने महामार्गाची मोठी दुरवस्था झाल्याचे माने यांनी नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणले. त्यावर त्यांनी वरीलप्रमाणे आदेश दिले. त्याचबरोबर 945 कोटी रुपये खर्चाच्या पेठ-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या डीपीआरला मंजुरी देण्यात येईल, असेही गडकरी म्हणाले.

दै. ‘पुढारी’ने सातत्याने सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्‍न मांडला होता. शिवाय रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आलेले 19 कोटी रुपयेही वाया जाऊन सांगली-कोल्हापूर खड्ड्याचा महामार्ग बनला आहे, असे सडेतोड वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन धैर्यशील माने यांनी सांगली-कोल्हापूर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गुरूवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेवून या मार्गाचा आढावा दिला. त्याचबरोबर विलगीकरणामुळे पुढील भूसंपादन करण्याचे आदेश त्यांनी दिल्याने दै.पुढारीच्या वृत्ताला बळ मिळाले आहे.

कोल्हापूर- सांगली महामागार्र्वरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे याचे तातडीने विस्तारीकरण झाले पाहिजे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर पेठनाका-इस्लामपूर-आष्टा ते सांगली हा रस्ता अतिशय खराब झाला असून त्याचे चौपदरीकरण करून काँक्रीटीकरण करणे गरजेचे असल्याचे माने यांनी सांगितले. त्यावर 945 कोटी रुपयांचा जो प्रस्ताव माने यांनी सादर केला त्या डीपीआरला मंजुरी देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.

Back to top button