विभागीय फुटबॉल स्पर्धा : कोल्हापूर मनपाचा महाराष्ट्र हायस्कूल संघ अजिंक्य | पुढारी

विभागीय फुटबॉल स्पर्धा : कोल्हापूर मनपाचा महाराष्ट्र हायस्कूल संघ अजिंक्य

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अंतिम सामन्यात कोल्हापूर मनपाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्र हायस्कूल संघाने सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सातारा सैनिक स्कूलचा ४ विरुध्द ० अशा गोलफरकाने धुव्वा उडवत विभागीय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटाचे अजिंक्यपद पटकाविले. महाराष्ट्र हायस्कूल संघाच्या ईशांत तिवलेने दोन तर सम्राट मोरबाळे व सर्वेश गवळी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उत्कृष्ट खेळाडू सम्राट मोरबाळे (महाराष्ट्र हायस्कूल) व लढवैय्या खेळाडू म्हणून आदित्य डेंगणूरकर (सातारा सैनिक स्कूल) यांना गौरवण्यात आले.

विजयी संघात ईशान हिरेमठ, शुभम कांबळे, धनंजय जाधव, श्रेयस निकम, प्रतीक पाटील, ईशान तिवले, हर्षवर्धन पाटील, सुयश सावंत, आदित्य पाटील, सर्वेश गवळी, सम्राट मोरबाळे, श्री भोसले, सोहम पाटील, पृथ्वीराज साळोखे, आदित्य पाटील यांचा समावेश आहे. सर्वांना प्रशिक्षक प्रदीप साळोखे, विजय पाटील, संतोष पोवार, शरद मेढे यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित शालेय विभागीय स्पर्धा कोडोली येथे सुरु आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कोल्हापूर मनपा (महाराष्ट्र हायस्कूल) संघाने रत्नागिरी जिल्हा (सेंट थॉमस स्कूल) संघावर ५-० असा एकतर्फी विजय मिविला. महाराष्ट्र  हायस्कूल संघाच्या श्रेयस निकमने दोन तर ईशांत तिवले, सर्वेश गवळी व सम्राट मोरबाळे यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत सातारा जिल्हा संघाने (सातारा सैनिक स्कूल) कोल्हापूर जिल्हा (संजीवन पब्लिक स्कूल) संघावर सडनडेथवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

विजयी व उपविजयी संघास कै. शामराव बाबुराव मांडवकर यांच्या स्मरणार्थ चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोडोली शिक्षण संस्था अध्यक्ष अजिंक्य अशोक पाटील, आशिष मांडवकर, क्रीडा अधिकारी उदय पवार, प्रदीप साळोखे, अमित शिंत्रे, रघु पाटील आदी उपस्थित होते. पंच म्हणून गौरव माने, अवधूत गायकवाड, ऋषिकेश दाभोळे यांना गौरविण्यात आले.

Back to top button