कोल्हापूर : नूलमधील मठाधिपती चंद्रशेखर महास्वामी यांचे महानिर्वाण - पुढारी

कोल्हापूर : नूलमधील मठाधिपती चंद्रशेखर महास्वामी यांचे महानिर्वाण

नूल; पुढारी वृत्तसेवा: पश्चिम महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नूल (ता. गडहिंग्लज) येथील सुरगीश्वर मठाचे मठाधिपती श्री. ष. ब्र.१०८ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे आज शुक्रवार (दि.२७) रोजी पहाटे महानिर्वाण झाले.

महास्वामींजी सुरगीश्वर मठाचे १२ वे मठाधिपती म्हणून कार्यरत होते. ४५ वर्ष त्यांनी धार्मिक, अध्यात्मिक वैदिक व लिंगायत तत्वांचा प्रचार व प्रसार केला.

गडहिंग्लज तालुका व कर्नाटकातील अनेक मंदिर व मठांची चंद्रशेखर महास्वामी यांनी उभारणी केली. त्यांनी अनेक शिष्यांना गुरूकुल पद्धतीने वैदिक ज्ञान दिले. इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल शाळा व लक्ष्मी नागरी पत संस्थांच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. २५ वर्ष त्यांनी गावास मोफत जलदान केले.

दीड कोटी खर्चून केला मठाचा जिर्णोद्धार

चंद्रशेखर महास्वामी यांच्या कारकिर्दीत दीड कोटी रूपये खर्चून मठाचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. बांधकाम शास्त्र, पंचांग व ज्योतिष शास्त्रात ते पारंगत होते. नूलचे ग्रामदैवत मारूती मंदिर जिर्णोद्धार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.

कणगला (कर्नाटक) येथे ६ एप्रिल १९३८ साली आचार संपन्न हिरेमठ कुलात महास्वामींचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लिंगय्या, आईचे नाव निलांबिका असे होते. गावातील प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी जगद्गुरु विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली काशी विज्ञान पीठातून धार्मिक शिक्षण घेतले.

बंगळूरच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून साहित्य अलंकार ही पदवी त्यांनी घेतली. यानंतर त्यांनी उपाचार्यरत्न पदवी प्राप्त केली.

१९९९ ला त्यांच्या एकसष्टीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता. २९ जानेवारी २०२० ला त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा सोहळा पार पडला. त्याचवेळी त्यांनी मठाचे उत्तराधिकारी म्हणून श्री. ष. ब्र. १०८ गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची नियुक्ती केली.

हेही वाचलंत का? 

पाहा : कोल्हापूर : सामाजिक जाणिवेतून अंध बांधवांची आरोग्य तपासणी

Back to top button