रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील शिरोली-उदगांव भूसंपादनास तत्वत: मान्यता | पुढारी

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील शिरोली-उदगांव भूसंपादनास तत्वत: मान्यता

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील शिरोली-उदगांव-अंकली पर्यंतच्या मार्गाच्या भूसंपादनास तत्वत: मान्यता मिळाली आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात सांगली-कोल्हापूर महामार्ग विलिनीकरण करण्यात आला आहे. अंकलीपर्यंतचे काम पूर्ण झाले असून, उर्वरीत उदगांव ते शिरोली महामार्गावरील भूसंपादन रखडल्याने रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. ही बाब खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पटवून दिली. यानंतर मंत्री गडकरी यांनी येत्या दोन महिन्यांत भूसंपादनाचे काम सुरू करून प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

दै.पुढारीने सातत्याने सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न मांडला होता. रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आलेले 19 कोटी रूपयेही वाया जावून सांगली-कोल्हापूर खड्ड्याचा महामार्ग बनला आहे. असे सडेतोड वृत्त दै.पुढारीने प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेवून खासदार माने यांनी सांगली-कोल्हापूर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गुरूवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. यावेळी खासदार माने यांनी सांगली-कोल्हापूर महामार्गाची व्यथा सांगितली. या मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले असून, तातडीने सांगली-कोल्हापूर महामार्गाचे विस्तारीकरण झाले पाहिजे. तसेच सध्या विलगीकरणाचा प्रश्न निकालात निघला असला तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. खड्ड्यांमुळे महामार्गाची दयनिय अवस्था झाली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शिरोली-उदगांव-अंकलीपर्यंत रस्त्याचे भूसंपादन तात्काळ केले जाईल. तसेच या मार्गावरील तात्पुरती दुरुस्ती करून वाहतुकीसाठीचा प्रश्न मार्गी लावू, आष्टा-सांगली मार्गाचे काँक्रीटकरण करू, असे अश्वासन दिले. तसेच येत्या दोन महिन्यांत भूसंपादनाचा विषय मार्गी लावावा, असे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न निकालात निघण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button