आतापासूनच ईर्ष्या, जल्लोषाला सुरुवात | पुढारी

आतापासूनच ईर्ष्या, जल्लोषाला सुरुवात

कोल्हापूर : सागर यादव कर्णकर्कश साऊंड सिस्टिमच्या तालात, चित्र-विचित्र आणि भसाड्या आवाजात ‘एकच…, नाद करायचा नाय…, अमूक पेठेचा, तमूक तालमीचा, आमक्या चौकाचा, तमक्या गल्‍लीचा राजा अशा स्वयंघोषित बिरुदावल्या लावून गणेशोत्सवातील आपले वेगळेपण सांगण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आतापासूनच करू लागला आहे. ‘सर्वात मोठा आगमन सोहळा’, ‘कोल्हापूरच्या राजाचे आगमन’ या व अशा पोस्ट व्हायरल करून आपणच बेस्ट असल्याचे सांगण्यावर मंडळांचा भर आहे. यामुळे गणेशोत्सवातील गणेश आगमनापासूनच ईर्ष्येची सुरुवात झाल्याचे चित्र आहे.  यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने आणि राज्य शासनाकडून निर्बंधमुक्‍त सण-उत्सव साजरे करण्याची घोषणा झाल्याने लोकांमध्ये आगामी सण-उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्यासाठी प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. यामुळे यंदाचे दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र हे सण जल्‍लोषात साजरे करण्याची तयारी तालीम संस्था, तरुण मंडळांच्या वतीने सुरू आहे.

तब्बल महिनाभर आधीच मूर्तीचे आगमन

यंदाचा गणेशोत्सवाची सुरुवात 31 ऑगस्ट रोजी होणार असली, तरी कोल्हापुरात सार्वजनिक गणेश मूर्तींचे आगमन तब्बल महिनाभर आधीपासूनच सुरू झाले आहे. रंकाळवेस गोल सर्कल मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचे स्वागत 1 ऑगस्ट रोजीच झाले. कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत मूर्तीचे जंगी स्वागत व मिरवणूक काढण्यात आली. पहिल्याच मंडळाने अशी दमदार सुरुवात केल्याने इतर मंडळांकडूनही यापेक्षा सरस आगमन मिरवणूक काढण्याची घोषणा केली आहे. ‘एस.पी. बाईज’तर्फे ‘21 ऑगस्ट रोजी सर्वात मोठा आगमन सोहळा’ अशी पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आली आहे.

सोशल मीडियामुळे खतपाणी

तालीम, मंडळांतील ईर्ष्येला सोशल मीडियामुळे खतपाणी मिळत आहे. आमचीच पेठ-तालीम-मंडळ सर्वात मोठे, आमचाच उत्सव सर्वात वेगळा दाखवून देण्यासाठी विविध प्रकारच्या पोस्ट सातत्याने सोशल मीडियावरून व्हायरल केल्या जात आहेत. तालीम-मंडळाचा वारसा, सामाजिक परंपरा, क्रीडा क्षेत्रातील कार्य यांची माहिती छायाचित्रांसह व्हायरल केली जात आहे. याच बरोबरच गणेशमूर्तीची उंची, त्यावरील दागिने, देखाव्यातील वेगळेपण, मिरवणुकांना होणारी गर्दी यांची छायाचित्रे व व्हिडीओही अपलोड केले जात आहेत.

Back to top button