
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा बुधवारी सायंकाळनंतर झालेल्या मुसळधार पावसाने शहरवासीयांची अक्षरश: तारांबळ उडाली. सुमारे तासभर आणि अचानक झालेल्या धुवांधार पावसाने शहरवासीयांना चांगलीच धडकी भरली. धुवांधार पाऊस सुरू झाल्याने काही क्षणात रस्त्यावरील वर्दळ थंडावली. फेरीवाले, विद्यार्थी, वाहनधारकांसह नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली. गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती. बुधवारी सकाळपासून शहरात कडक ऊन होते. हवेत उकाडा जाणवत होता. दुपारनंतर अचानक ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.अचानक आलेल्या धुवांधार पावसाने शहरात चांगलीच दैना उडाली.
मुसळधार पावसाने विविध भागांत मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. अल्पावधीतच अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मुळात खड्ड्यांचे साम—ाज्य असल्याने जागोजागी पाणी साचल्याने वाहनधारकांची विशेषत: दुचाकीस्वारांची पंचाईत झाली. पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात झाले. गेले काही दिवस पाऊस नसल्याने नागरिकांनी रेनकोट, छत्र्यांना विश्रांती दिली होती; मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने अनेकांनी संपूर्ण पाऊस अंगावर घेत मार्गक्रमण केले. शाळकरी विद्यार्थी, फेरीवाले, फळ विके्रते यांची चांगलीच पंचाईत झाली. रस्त्यावर पाणी साचल्याने साहित्याची आवराआवर करताना फेरीवाल्यांची धांदल उडाली.
अनेक ठिकाणी साहित्य पावसात ठेवून विक्रेत्यांनी पावसापासून संरक्षणासाठी आडोसा धरला. पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी अनेकांनी टपर्या, दुकानांचा आधार घेतला. अनेकानी मिळेल तेथे थांबून पावसापासून बचाव केला. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने काही फेरीवाल्यांचे साहित्य वाहून गेले. सकाळपासून वर्दळीने माखलेले रस्ते सायंकाळी पावसानंतर मात्र तुरळक वर्दळीचे बनले. शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर, शहाजी लॉ कॉलेज चौक, परिख पूल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हुतात्मा पार्क आदींसह शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांसह नागरिकांचीही त्रेधातिरपीट उडाली.
अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसासोबतच विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. वारंवार होणारा विजांचा कडकडाट नागरिकांना धडकी भरवणारा होता. एकीकडे मुसळधार पाऊस, तर दुसरीकडे विजांचा चमचमाट आणि कडकडाटामुळे नागरिकांत घबराट पसरली होती.