‘कॅलिओफिस कॅस्टो’ सर्पाची गगनबावड्यात नोंद | पुढारी

‘कॅलिओफिस कॅस्टो’ सर्पाची गगनबावड्यात नोंद

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे सापडणार्‍या ‘कॅलिओफिस कॅस्टो’ या अत्यंत दुर्मीळ सापाची दुसरी नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावड्यात झाली आहे. शिवाजी विद्यापीठाचे निसर्ग अभ्यासक सचिन कांबळे (रा. गगनबावडा) यांनी याबाबत संशोधन केले असून सरीसृपतज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांनी या सापाची ओळख पटवून दिली आहे. गगनबावड्यातील या सापाच्या अधिवासामुळे पश्‍चिम घाटातील या तालुक्याची समृद्ध जैवविविधता अधोरेखित झाली आहे.

बंगळूरमधील वन्यजीव अभ्यासक प्रवीण एच. एन. आणि शिवाजी विद्यापीठात प्राणीशास्त्राचे विद्यार्थी सचिन कांबळे यांनी ही नोंद केली. आंतरराष्ट्रीय नियतकालिक ‘हमदर्याद’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. यापूर्वी ही नोंद सरीसृपतज्ज्ञ डॉ. वरद गिरी आणि सहकार्‍यांनी 2013 मध्ये आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथून केली आहे. सांगशी (ता. गगनबावडा) येथे 28 जून 2020 रोजी सचिन कांबळे यांना हा सर्प जमिनीखाली आढळला. यापूर्वी या सापाची पाहिली नोंद आजर्‍यातून मयूर जाधव आणि सहकार्‍यांनी केली होती. सरीसृपतज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांनी हा सर्प ‘कॅलिओफिस कॅस्टो’ प्रजातीमधील असल्याचे स्पष्ट केले. त्याला रुजबेह गझदार आणि अनुज शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.

भारतात पाच प्रजातींचा आढळ

‘कॅलिओफिस कॅस्टो’ या वंशामध्ये सध्या 15 मान्यताप्राप्त प्रजाती आहेत. यापैकी भारतात पाच प्रजाती आढळतात. यापूर्वी 2000 मध्ये पहिली नोंद झाली होती. पश्‍चिम घाटातून याची नोंद आंबोली (महाराष्ट्र), कारवार (कर्नाटक) आणि डिचोली-बिचोलीम (दक्षिण गोवा) या वेगवेगळ्या भागांत झाली होती. अलीकडे कोटिगाव वन्यजीव अभयारण्य (गोवा, 2021) व मडिलगे आणि होनेवाडी (महाराष्ट्र, 2021) येथूनही नोंद झाली आहे.

Back to top button