राज्यातील शहरे होणार सुंदर ! | पुढारी

राज्यातील शहरे होणार सुंदर !

कोल्हापूर : अनिल देशमुख राज्यातील शहरे सुंदर होणार आहेत. नगरविकास विभागाने शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व नगरपालिका आणि महापालिकांना दिले आहेत.
वाढते नागरिकीकरण आणि त्यामुळे पायाभूत सुविधांवर येणारा ताण, याचा परिणाम म्हणून अनेक शहरे, शहरातील काही भाग दिवसेंदिवस बकाल होत असल्याचे चित्र आहे. अस्वच्छता, त्यातून वाढणारी रोगराई आणि त्याचा शहराच्या एकूणच प्रतिमेवर होणारा परिणाम या सर्वांचा विचार करून राज्य शासनाने राज्यातील शहरे सुंदर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरीता शहर सौंदर्यीकरण अभियान राबविले जाणार आहे. या अभियानासाठी नगरविकास विभागाने कंबर कसली असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती निश्‍चित केली आहे.

अभियान का राबविणार?

शहराची नव्याने ओळख निर्माण केली जाईल. त्यातून शहराचे नव्याने ब्रँडिंग करता येईल, हाच या अभियानामागील मुख्य उद्देश आहे. याखेरीज संबंधित शहराची स्थानिक संस्कृती, परंपरा आणि इतिहास जोपासला जावा या द‍ृष्टीने हे अभियान राबविले जाणार आहे.

अभियान कोण राबविणार?

हे अभियान राबविण्याची संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कृती गट (टास्क फोर्स) तयार केला जाणार आहे. यामध्ये आयुक्‍त, मुख्याधिकारी, शहर अभियंता, नगरअभियंता, नगररचनाकार, आरोग्य विभाग अथवा स्वच्छताविषयक अधिकारी, आयुक्‍त अथवा मुख्याधिकार्‍यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्यासह निमंत्रित आणि विशेष निमंत्रित सदस्यांचा सहभाग आहे.

अभियानात कोण सहभागी होणार?

खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक आणि महिला यांना या अभियानात सहभागी करून घेतले जाणार आहे. विविध उद्योग, संस्थांचा सीएसआर फंड, नगरपालिका, महापालिकांचा स्व-निधी यासाठी वापरला जाणार आहे. संस्थांना त्यांचे नामफलक लावता येणार आहेत.

अभियानांतर्गत हे होणार

अस्वच्छ जागा निश्‍चित होणार, त्यांची स्वच्छता सुशोभीकरण करणार, मध्यवर्ती चौकाचे सुशोभीकरण, चित्रे, शिल्पे, कारंजे, सामाजिक तसेच जनजागृती देणारे संदेशाचे फलक उभारणे, वाहतूक आयलँड सुशोभीकरण व स्वच्छ करणे, रस्ते, दुभाजकावर शोभिवंत व फुलांची झाडे, दुभाजकांमध्ये शिल्प उभारणे, रस्त्यांच्या दुतर्फा भिंतीवर जनजागृतीची चित्रे, प्रमुख इमारती, हेरिटेज इमारती, शाळा-महाविद्यालयाबाहेर समर्पक चित्रे रेखाटने, या इमारतीसह भुयारी मार्ग, शिल्प, कारंजे आदी ठिकाणी रोषणाई करणे, तलाव, जलाशये स्वच्छ करणे, तरंगणारा कचरा काढणे, सभोवतली फुलांची तसेच शोभिवंत झाडे लावणे, विविध संकल्पनेवर बगीचे करणे, शहरात सेल्फी पॉईंट उभे करणे, दुकानांवरील नामफलक एकसारखे करणे, झोपडपट्टी, गावठाणाची स्वच्छता, दिशादर्शक, नामफलकावर एकसमान आणि आकर्षक रंगसंगती ठेवणे.

Back to top button