कोल्हापूर : गर्भलिंग निदान सेंटर प्रकरणी डॉक्टर पत्नी, ३ एजंटांना अटक | पुढारी

कोल्हापूर : गर्भलिंग निदान सेंटर प्रकरणी डॉक्टर पत्नी, ३ एजंटांना अटक

कोल्हापूर : पुढारी वृतसेवा

परिते-कुरुकली (ता. करवीर) येथील गर्भलिंग निदान सेंटरप्रकरणी करवीर पोलिसांनी फराकटेवाडी- बोरवडे (ता. कागल) येथील डॉक्टर पत्नीसह तिघांना गुरुवारी अटक केली. भारती कृष्णात फराकटे (वय 45), एजंट लक्ष्मण भिकाजी वाकरेकर (43, सुळे, ता. पन्हाळा), दिगंबर मारुती किल्लेदार (42, टिटवे, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत. गर्भलिंग निदानप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता 13 वर पोहोचली आहे.

संशयित वाकरेकर व किल्लेदार यांना न्यायालयाने 7 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. गर्भलिंग निदान सेंटरप्रकरणी सीमाभागातील आणखी सहा-सात एजंटांची नावे पुढे येत आहेत. एजंटांसह गर्भलिंग निदान करण्यास प्रवृत्त करणार्‍यांचाही लवकरच पर्दाफाश करण्यात येईल, असे तपासाधिकारी तथा सहायक निरीक्षक विवेकानंद राळेभात यांनी सांगितले. भारती फराकटे यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

परिते येथील बेकायदा गर्भलिंग निदान सेंटरवर करवीर पोलिसांनी छापा टाकून मुख्य संशयित राणी कांबळे, महेश पाटील याच्यासह दोन एजंटांना अटक केली होती. चौकशीत आणखी 5 जणांचा सहभाग निष्पन्न झाल्याने संबंधितांना अटक करण्यात आली होती. फराकटेवाडी- बोरवडे येथील डॉक्टर पत्नी भारती फराकटे यांनाही करवीर पोलिसांनी पंधरवड्यापुर्वी ताब्यात घेतले होते. मात्र वैद्यकीय कारणामुळे त्यांची अटक लांबणीवर पडली होती. गुरुवारी सायंकाळी त्यांचा ताबा घेण्यात आला.

घसघशीत कमाईचा गोरखधंदा

एजंट वाकरेकर, किल्लेदार हे राधानगरी, भुदरगडसह सीमाभागातील गर्भवती महिलांच्या नातेवाईकांना गाठून त्यांना गर्भलिंग निदानासाठी प्रवृत्त करीत होते. त्यासाठी राणी कांबळे, महेश पाटील यांच्याकडून त्यांना कमिशन मिळत होते. वर्षभर त्याचा मिळकतीचा गोरखधंदा सुरू होता, असेही चौकशीत निष्पन्न झाले आहे, असेही राळेभात यांनी सांगितले.

गर्भलिंग निदान सेंटरप्रकरणी सीमाभागातील आणखी एजंटांची नावे पुढे येत आहेत. त्यामुळे एजंटांसह गर्भलिंग निदान करण्यास प्रवृत्त करणार्‍यांचाही लवकरच पर्दाफाश करण्यात पोलिसांना येईल

हे देखिल वाचा : 

Back to top button