राधानगरी : तिटवे येथील दूधगंगा नदीमध्ये मृत अर्भक दिसून आल्याने परिसरात खळबळ | पुढारी

राधानगरी : तिटवे येथील दूधगंगा नदीमध्ये मृत अर्भक दिसून आल्याने परिसरात खळबळ

कसबा वाळवे; पुढारी वृत्तसेवा :  तिटवे ( ता.राधानगरी) येथील दूधगंगा नदीपात्रातील पाण्यातून मृत अर्भक वाहत जात असल्याचे लोकांना दिसून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत तिटवे नागरिकांतून समजलेली माहिती अशी,चार दिवसांपूर्वी तिटवे नदीघाटावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांना नदीपात्रात अंदाजे पाच महिन्यांचे अर्भक वाहत जात असल्याचे दिसून आले. यावेळी जनावरे चारण्यासाठी घेऊन गेलेल्या लोकांनाही ते अर्भक दिसल्याने त्यांनी मोबाईलवर त्याचे फोटो घेतले.मात्र याची कोणतीही माहिती या महिलांनी आणि गुराख्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिली नाही. या घटनेने या परिसरात स्त्री भ्रूण हत्या होत असाव्यात याला दुजोरा मिळाला आहे. आज रात्री या घटनेची चर्चा सुरू झाली मात्र अद्याप हे अर्भक सापडले नसल्याने ते कोणाचे,कुणी टाकले, गर्भपात झाला की अन्य कारणातून हे अर्भक नदीत टाकण्यात आले हे स्‍पष्‍ट झालेले नाही.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी आहे ही गंभीर बाब आहे.मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक विशिष्ट पथक कार्यरत आहे, मात्र अद्याप या पथकाला स्त्री भ्रूणहत्येचे रॅकेट सापडले नाही. चार दिवसांपूर्वी बिद्री येथील विनापरवाना दवाखान्यात धाड टाकण्याचे काम विशेष पथकाने केले होते.

मृत अर्भका बदल आम्हाला कुणीही सांगितले नाही. तिटवे ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर्स यांना शोध घेण्यास सांगितले. त्यावेळी नदीपरिसरात काहीही आढळले नाही, असे कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ स्वाती चौगले यांनी सांगितले.

 हेही वाचलंत का?

Back to top button