कोल्हापूर : भावनिक साद अन् शिवसेनेत चैतन्य! | पुढारी

कोल्हापूर : भावनिक साद अन् शिवसेनेत चैतन्य!

कोल्हापूर ; सतीश सरीकर : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सर्वसामान्य शिवसैनिकांत संभ्रमावस्था होती. नेमके करायच काय? पुढे पक्षाचे होणार काय, असे अनेक प्रश्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसमोर होते. त्यातच आमदार-खासदारांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक अधिकच सैरभैर झाले होते. शिवसैनिकांना सावरून त्यातून बाहेर काढण्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा महाराष्ट्रभर सुरू केली आहे. त्याला मिळणार्‍या प्रतिसादाने खुद्द आदित्य ठाकरे यांच्यासह पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्तेही भारावले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर दौर्‍याची सुरुवात झाली आजरा शहरातून. आजर्‍यात ठाकरे यांचे जंगी स्वागत झाले. त्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी हेच चित्र पाहायला मिळाले. ठाकरे यांनीही या दौर्‍यात वैयक्तिक टोकाची टीका करण्यापेक्षा शिवसैनिकांना भावनिक साद घातली. व्यासपीठावर न थांबता थेट जनतेत मिसळत शिवसैनिकांत चैतन्य निर्माण केले. हेच ठाकरे यांच्या दौर्‍याचे फलित समजावे लागेल. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका लढण्यासाठी या दौर्‍याने राजकीय बळ मिळेल, असे दिसते.

शिवसेना बळकटीकरणाचे आवाहन

ठाकरे यांनी आजर्‍यातील सभेत आ. प्रकाश आबिटकर यांच्यावर हल्लाबोल केला. आ. आबिटकर यांना सुमारे 550 कोटींचा निधी विकासकामासाठी दिल्यानंतरही ते का गेले, हा प्रश्न पडल्याचे सांगितले. कोल्हापूर शहरातील सभेत मात्र त्यांनी खा. संजय मंडलिक व खा. धैर्यशील माने यांच्यासह राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर थेट टीका करण्याचे टाळले. शिरोळमध्ये माजी आमदार उल्हास पाटील हे पुन्हा विजयी होतील, असे सांगत आ. यड्रावकर यांना अप्रत्यक्ष निशाण्यावर घेतले. ठाकरे यांनी आपल्या दौर्‍यात वैयक्तिक टीकाटीप्पणीपेक्षा शिवसेनेची विस्कटलेली मोट बांधण्याचा प्रयत्न केला. ठाकरे यांच्याकडून शिवसेनेतील दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांना प्राधान्याने पुढे केले.

तुल्यबळ उमेदवारांची वाणवा

शिवसेनेच्या स्थापनेनंतरही कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेची पाटी कोरीच होती. एकही लोकप्रतिनिधी नव्हता. कालांतराने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर जिल्ह्यात एकेक आमदार निवडून येऊ लागले. 2014 ला तब्बल शिवसेनेचे सहा आमदार विजयी झाले. यात राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरुडकर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील आणि प्रकाश आबिटकर यांचा समावेश होता. परंतु, तरीही कोल्हापूरला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.

2019 ला फक्त आबिटकर निवडून आले. इतरांना पराभवाचा सामना करावा लागला. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरकरांना शिवसेनेला भरघोस मतदान करून जिल्ह्यातील दोन्ही जागांवर धनुष्यबाणाचे उमेदवार निवडून दिले. प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने शिवसेनेचे खासदार झाले. सद्यस्थितीत या दोन्ही खासदारांसह एकमेव आ. आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर हे मुख्यमंत्री शिंदे गटात आहेत. सद्यस्थितीत शिवसेनेचा जिल्ह्यात एकही लोकप्रतिनिधी नाही.

येत्या काळात कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका ताकदीने लढविण्यासाठी शिवसेनेला तुल्यबळ उमेदवार शोधावे लागणार आहेत.

गटबाजी सोडविण्याचे आव्हान

कोल्हापुरात शिवसेनेला स्थापनेपासून गटबाजीचे ग्रहण आहे. जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुखांचे कधी पटत नाही. इतर पदाधिकार्‍यांचीही हीच अवस्था आहे. त्यामुळे राज्यात एकमेव कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल तीन जिल्हाप्रमुख आणि शहरात दोन शहरप्रमुख नियुक्त केले जातात. दुफळीमुळे शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांत कधीही भरघोस यश मिळत नाही. त्यातच आता जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि एकमेव आमदारही शिवसेनेतून फुटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांच्यासह माजी आमदारांवर आता शिवसेनेची धुरा आहे. काही माजी आमदारांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे.

Back to top button