कोल्हापूर : मूर्ती विसर्जन अभ्यासासाठी समिती | पुढारी

कोल्हापूर : मूर्ती विसर्जन अभ्यासासाठी समिती

कोल्हापूर : आशिष शिंदे : पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषित होते. यामुळे दिवसागणिक पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. मूर्ती विसर्जनामुळे नैसर्गिक जलस्रोतांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पीओपीला ईको फ्रेंडली पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे.

सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित लवाद यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक उत्सवासाठी कार्यपद्धती निश्चित करणे ही या समितीची मुख्य कार्यकक्षा असणार आहे.

नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये मूर्तींच्या विसर्जनामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी समिती उपाययोजना सुचविणार आहे. ही समिती तीन महिन्यांत आपला अहवाल महाराष्ट्र सरकारला सादर करणार आहे.

पीओपीच्या मूर्तींवर रासायनिक रंग लावल्यामुळे मूर्ती विसर्जनानंतर पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते. यामुळे जलचरांना फटका बसतो. या मूर्ती विरघळत नसल्याने नैसर्गिक जिवंत झरे बंद होतात. त्यामुळे शक्यतो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती खरेदी न करता पर्यावरणपूरक मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले जाते.

ही समिती सर्वेक्षण करून नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये मूर्तींच्या विसर्जनामुळे होणारे प्रदूषण नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांचा अहवाल सरकारला देणार आहे.

समितीची कार्यकक्षा

मूर्तींच्या विसर्जनामुळे होणारे नैसर्गिक पाणवठ्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय.
इको फ्रेंडली मूर्तींसाठी पीओपीला पर्यायी साहित्य सुचविणार
मूर्ती निर्मितीसाठी पीओपीचा वापर टाळण्यासाठी सुचविणार उपाययोजना

Back to top button