कोल्हापूर : अल्पवयीन मुलीकडून तेरा हजार रुपये उकळले | पुढारी

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीकडून तेरा हजार रुपये उकळले

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर फोटो टाकून बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीकडून 13 हजार रुपयांची खंडणी उकळून आणखी 10 हजारांची मागणी केल्याप्रकरणी चिन्मय गिरीश कुलकर्णी (वय 20, रा. जवाहरनगर) या महाविद्यालयीन युवकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती प्र. पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी दिली.

संशयित चिन्मय कुलकर्णी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्याने ओळखीच्या एका मुलीसोबत संपर्क वाढवला. त्यानंतर त्याने फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली. यातून त्याने तीन हजार रुपये उकळले. आणखीन काही दिवसांनंतर पुन्हा धमकावून दहा हजार रुपये घेतले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा आणखी दहा हजार रुपयांसाठी त्याने तगादा लावला होता. तसेच भावासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

त्याच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने याबाबतची माहिती पालकांना सांगितली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी रात्री उशिरा संशयित चिन्मय याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. संशयिताने खंडणीच्या रकमेचे काय केले, याचा तपास शिवाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे. यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचीही माहिती घेण्यात येत असल्याचे निरावडे यांनी सांगितले.

Back to top button