कोल्हापूर : पुरवठा विभागाची 19 पदे रद्द | पुढारी

कोल्हापूर : पुरवठा विभागाची 19 पदे रद्द

कोल्हापूर : अनिल देशमुख : सार्वजनिक रेशन व्यवस्था चालवणार्‍या पुरवठा विभागाची जिल्ह्यातील 19 पदे रद्द होणार आहेत. या निर्णयाची शुक्रवार, दि. 5 ऑगस्टपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने पुरवठा विभागाचा सुधारित आकृतिबंध तयार केला आहे.

या नव्या आकृतिबंधानुसार दि. 4 ऑगस्टपर्यंत रचना करून जादा होणारे कर्मचारी महसूल विभागाकडे पाठवले जाणार आहेत. यामुळे सध्या पुरवठा विभागाकडे काम करणार्‍या राज्यातील 500 हून अधिक महसूल कर्मचार्‍यांना मूळ विभागात परतावे लागणार आहे. शिपाई आणि वाहनचालकांची पदे यापुढे कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत.

राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा सार्वजनिक रेशन व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभाग, तहसील कार्यालयातील पुरवठा शाखा, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे कार्यालय आणि गोदाम या ठिकाणी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाते. मात्र, या विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांची संख्या कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार नवा आकृतिबंध तयार करण्यात आला असून, त्यानुसार दि. 4 ऑगस्टपर्यंत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील 19 पदे रद्द

जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभाग, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, गोदाम आदी पुरवठा विभागातील 19 पदे रद्द होणार आहेत. या पदांवरील महसूल कर्मचार्‍यांना अन्य पदांवर सामावून घेतले जाणार आहे. शिपाई आणि चालक ही पदेही जाणार असून, ती कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. जिल्ह्यात शिपायांच्या मंजूर सर्व जागा भरल्या आहेत. यामुळे सध्या पुरवठा विभागात असलेल्या दोन शिपायांची नियुक्ती कोठे करायची, हा प्रश्न आहे.

पाचजणांचेच शहर अन्नधान्य वितरण कार्यालय

कोल्हापूरसह सांगली, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, औरंगाबाद, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या नऊ शहर अन्नधान्य वितरण कार्यालयांत यापुढे केवळ एक अधिकारी, तीन कर्मचारी आणि एक कंत्राटी शिपाई असे पाचच लोक कार्यरत राहणार आहेत.

पुरवठा विभाग स्वतंत्र होणार?

महसूल आणि वन हा मूळ विभाग, या विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर आजअखेर कामकाज सुरू असलेला पुरवठा विभाग स्वतंत्र होणार आहे. त्याची ही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते. पुरवठा निरीक्षक ही पदे गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्रपणे भरली जात आहेत. यापुढे आता पुरवठा विभागातील ही नवी पदेही स्वतंत्रपणे भरली जातील आणि हा विभागाच स्वतंत्र होईल, अशी शक्यता आहे.

रेशन व्यवस्था कोलमडण्याची भीती

धान्य वितरणापासून त्यावर नियंत्रण ठेवण्यापर्यंत, नवीन रेशन कार्ड देण्यापासून त्यातील दुरुस्तींसह अनेक कामे या विभागाकडे असतात. कमी मनुष्यबळात या कामांवर परिणाम होईल आणि परिणामी या निर्णयामुळे सर्वसामान्यांचा आधारवड असलेली रेशन व्यवस्था कोलमडून जाईल, अशी भीती आहे.

Back to top button