कोल्हापूर : ग्रामसेविकेच्या मनमानी कारभारास कंटाळून पारदेवाडी ग्रा.पं.ला ठोकले टाळे | पुढारी

कोल्हापूर : ग्रामसेविकेच्या मनमानी कारभारास कंटाळून पारदेवाडी ग्रा.पं.ला ठोकले टाळे

गारगोटी ; पुढारी वृत्तसेवा : पारदेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेच्या मनमानी कारभारास कंटाळून सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. दरम्यान, ग्रामसेविकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गेल्या दीड वर्षापासून ग्रामसेविका उज्ज्वला जाधव यांनी या ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार घेतला आहे. यादरम्यान लोकनियुक्त सरपंच यांचे निधन झाले. त्यामुळे द्रौपदी मस्कर यांची सरपंचपदी निवड झाली. सरपंच निवड होऊन दोन महिने झाले, तरी ग्रामसेविका जाधव यांनी त्यांच्या सहीचे नमुने बँकेत सादर केले नाहीत. यामुळे गावातील विकासकामे खोळंबली. ग्रामसेविका स्वार्थासाठी विद्यमान सदस्यांमध्ये मतभेद निर्माण करत आहेत.

पंधराव्या वित्त आयोगातील कारभारही रामभरोसे असल्याचा आरोप सरपंच द्रौपदी मस्कर यांनी करून ग्रामसेविकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करत उपसरपंच शोभा रेडेकर, सदस्य आक्काताई सुतार, वैजयंती गवस, शंकर सुतार, सुनीता डावरे, प्रकाश सुतार, बाबुराव डावरे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.

Back to top button